Ticker

6/recent/ticker-posts

आक्राळे परिसरात मिरची पिकावर रोगाचा प्रादुर्भाव; शेतकरी चिंतेत.

 


आक्राळे : प्रतिनिधी - काशिनाथ रजाळे

​बाजारभावात सुधारणा झाल्याने आशा पल्लवित; पाने आकसल्याने उत्पादनात घट होण्याची भीती.

​आक्राळे : नंदुरबार तालुक्यातील आक्राळे व लगतच्या पंचक्रोशीत दुष्काळी परिस्थितीशी सामना करत शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने मिरचीचे पीक उभे केले आहे. सध्या बाजारात मिरचीच्या दरात समाधानकारक वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असल्या, तरी शिवारात अचानक विविध कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादकांपुढे नवे संकट उभे ठाकले आहे. मिरचीच्या झाडांवर ‘चुरडा-मुरडा’  रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पाने पूर्णपणे आकसून गेली असून शेंडे वाळू लागले आहेत. परिणामी, झाडांची वाढ खुंटून फुलोरा व फलधारणेवर विपरीत परिणाम झाल्याने दरवाढीचा प्रत्यक्ष लाभ पदरात पडेल की नाही, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.

​दरवाढीने समाधान, पण रोगाने वाढवली चिंता

​गेल्या काही दिवसांपासून बाजारात मिरचीला चांगला दर मिळत असल्याने आधी झालेल्या नुकसानीची काही प्रमाणात भरपाई होईल, असे समाधान शेतकऱ्यांमध्ये होते. मात्र, ऐन दरवाढीच्या काळातच पिकावर रोगाचा विळखा पडला आहे. रोगामुळे झाडांचा जोम कमी झाला असून नवीन लागवड आणि फुलोरा गळून पडत आहे. बाजारात भाव चांगला असूनही हातात विक्रीयोग्य उत्पादनच कमी आले तर नफ्याऐवजी तोटाच सहन करावा लागेल, या भीतीने बळीराजा हवालदिल झाला आहे.

​बदलत्या हवामानाचा तडाखा

​आक्राळे परिसरात अनेक शेतकऱ्यांनी मल्चिंग पेपर आणि ठिबक सिंचनाचा वापर करून आधुनिक पद्धतीने मिरचीची लागवड केली आहे. पावसाची मोठी तूट असतानाही विहिरी व कुपनलिकेचा उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून हे पीक जगवले गेले. मात्र, सध्या दुपारी कडक ऊन आणि कोरडे हवामान यामुळे रसशोषक किडींचा म्हणजेच थ्रिप्स, पांढरी माशी आणि मावा यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या किडींमुळे पानांमधील रस शोषला जाऊन झाडांवर व्हायरसचा संसर्ग पसरत आहे. त्यामुळे झाडांची पाने बोकडल्यासारखी गोळा झाली असून नवीन फुटवे येणे पूर्णपणे बंद झाले आहे.

​महागड्या फवारण्या करूनही उपयोग शून्य

​हातातोंडाशी आलेले पीक वाचवण्यासाठी शेतकरी कृषी सेवा केंद्रांमधून महागडी कीटकनाशके, बुरशीनाशके आणि टॉनिक खरेदी करून वारंवार औषध फवारणी करत आहेत. मात्र, कडक ऊन आणि रोगाची वाढलेली तीव्रता यामुळे वारंवार फवारण्या करूनही रोगावर अपेक्षित नियंत्रण मिळताना दिसत नाही. यामुळे औषधे व मजुरीवर होणाऱ्या खर्चात प्रचंड वाढ झाली असून, तोडणीला येणाऱ्या मिरचीचे उत्पादन मात्र निम्म्यावर येण्याची भीती निर्माण झाली आहे.

​कृषी विभागाकडून प्रत्यक्ष पाहणी व मार्गदर्शनाची गरज

​आधीच पावसाअभावी इतर खरीप हंगाम वाया गेला आहे. त्यातच नगदी पीक म्हणून लावलेली मिरचीही रोगाच्या विळख्यात सापडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कृषी विभागाने आक्राळे शिवारातील शेतांची तात्काळ पाहणी करावी आणि या रोगाचे नेमके निदान करून शेतकऱ्यांना योग्य तांत्रिक मार्गदर्शन व उपाययोजना सुचवाव्यात, अशी जोरदार मागणी परिसरातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांमधून केली जात आहे.