प्रतिनिधि=रोशन ओलोकार
धारणी : रब्बी हंगामाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने तालुका कृषी कार्यालय, धारणी, आत्मा (ATMA), अमरावती आणि समाज प्रगती सहयोग (SPS), मेळघाट यांच्या संयुक्त विद्यमाने SPS कार्यालयात शेतकरी प्रशिक्षण व बियाणे वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात परिसरातील सुमारे १०० महिला शेतकऱ्यांनी (शेतकरी दीदींनी) उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
बदलत्या हवामान परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य अल निनो (El Niño) प्रभावाचा विचार करून रब्बी हंगामातील पीक नियोजन, कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची निवड, पिकांचे योग्य व्यवस्थापन आणि उपलब्ध जलस्रोतांचा काटकसरीने वापर याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कमी पाण्यात अधिक उत्पादन मिळविण्यासाठी योग्य पीक पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी श्री. उमेश जाधव आणि आत्मा (ATMA) चे श्री. प्रमोद दुबे उपस्थित होते. त्यांनी रब्बी हंगामाची पूर्वतयारी, हवामानातील बदलांनुसार पीक पद्धतींची निवड आणि शाश्वत शेती तंत्रज्ञानाच्या वापराबाबत मार्गदर्शन केले.
या उपक्रमांतर्गत SPS च्या वतीने प्रत्येक महिला शेतकऱ्याला १० किलो हरभरा/ चना बियाण्याचे वितरण करण्यात आले. तसेच कृषी विभाग आणि आत्मा यांच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला १ किलो ज्वारी, मोहरी आणि जवस या पिकांच्या बियाण्यांचे वाटप करण्यात आले.
महिला शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी सक्षम करणे, कमी पाण्यात शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे आणि बदलत्या हवामान परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या पीक व्यवस्थापन पद्धतींचा प्रसार करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. कृषी विभाग, आत्मा आणि SPS यांच्या समन्वयातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे महिला शेतकऱ्यांना आगामी रब्बी हंगामाच्या नियोजनासाठी आवश्यक मार्गदर्शन व बियाण्यांची उपलब्धता झाली आहे.





Social Plugin