शारीक शेख @ ग्रामीण प्रतिनिधी
लोणार १४.११.२०२६
समाजातील अंधार दूर करून शिक्षण, प्रबोधन, संघटन आणि सहकाराच्या माध्यमातून परिवर्तनाची ज्योत प्रज्वलित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले ‘आस्था-दीप संमेलन २०२६’ शनिवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी अमरावती येथील जोशी सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. लोणार सरोवर बुलढाणा जिल्हा येथील कै. कु. दुर्गा क. बनमेरू विज्ञान महाविद्यालयाचे कर्तव्यदक्ष प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू यांचा शैक्षणिक क्षेत्रातील विशेष कार्यप्रणाली शून्यातून विश्व निर्माण केले, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आज आपली वेगळी ओळख निर्माण केली. तसेच सामाजिक व पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत विशेष व्यक्तिमत्त्व म्हणून गौरव करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आस्था नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा अमरावती विभागाचे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता मा. श्री. प्रकाश नागपुरकर होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या तथा सत्यशोधक व्याख्यात्या प्रा. डॉ. सौ. नीलिमा मुळे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून दैनिक तरुण भारत, नागपूरच्या संचालिका तथा महिला समन्वय प्रमुख विदर्भ प्रांत सौ. मीरा कडवे उपस्थित होत्या. विशेष उपस्थिती म्हणून मुंबई येथील श्री. सचिन परब यांची उपस्थिती लाभली. याप्रसंगी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. उच्च पदप्राप्त व्यक्ती गौरव पुरस्काराने मुंबई येथील कस्टम विभागाचे IT Chief मा. श्री. संजय वैद्य यांना सन्मानित करण्यात आले. विशेष शैक्षणिक व सामाजिक कार्य गौरव पुरस्कार नांदगाव खंडेश येथील शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक तथा एकलव्य धनुर्विद्या अकॅडमीचे संस्थापक मा. श्री. सदानंद जाधव यांना प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात ‘वंदे मातरम्’ने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अंकुश मानकर यांनी केले, तर श्री. शिवा पिंपळकर सर यांनी प्रास्ताविकातून आस्था गृपचा कार्याचा व संमेलनाच्या आयोजनामागील उद्देशाचा परिचय करून दिला. श्री गजानन अंजनकर (आस्था गृप संस्थापक) यांनी आभार प्रदर्शन केले. विशेष म्हणजे, कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सौ. माया नांदूरकर यांनी भारतीय संविधानाचे वाचन करून संविधानातील मूल्यांचा जागर केला.
‘ चलो जलाऐ दीप वहाँ , जहाँ अभी भी अंधेरा है ’ या प्रेरणादायी विचाराला केंद्रस्थानी ठेवून आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनातून शिक्षण, संस्कार, महिला सक्षमीकरण, सामाजिक बांधिलकी आणि संविधानिक मूल्यांचा संदेश देण्यात आला. आस्था गृप महाराष्ट्राच्या वतीने आयोजित हे संमेलन समाजपरिवर्तनाच्या दिशेने प्रेरणादायी पाऊल ठरले.





Social Plugin