Ticker

6/recent/ticker-posts

नांदेड-निजामाबाद पॅसेंजरला डबे वाढवा

 

११० किमी अंतराला लागतो चार तास

उमरी : निजामाबाद-नांदेड व नांदेड ते निजामाबाददरम्यान धावणाऱ्या पॅसेंजर रेल्वेगाडीला वाढणारी प्रवासी संख्या लक्षात घेता या गाडीला डबे वाढविण्यात यावेत, अशी मागणी नांदेड रेल्वे विभागाकडे करण्यात आली आहे.

निजामाबाद ते नांदेड धावणाऱ्या प्रवासी सवारी गाडीला सध्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. लग्नसराई, उन्हाळी सुट्टया लक्षात घेता या गाडीने सर्वसामान्य गोरगरीब प्रवासी मोठ्या संख्येने प्रवास करीत असतात. सकाळ व संध्याकाळदरम्यान धावणाऱ्या या गाडीचे वेळापत्रक सर्वांच्या सोयीचे आहे. पर्यायाने रेल्वे विभागाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळत आहे. पूर्वी ही रेल्वेगाडी दहा ते बारा डब्यांची होती कालांतराने गाडीचे डबे बदलण्यात

आले आणि डब्यांची संख्या कमी करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांची कुचंबणा होत आहे. पूर्वीप्रमाणेच ही रेल्वे १२ डब्यांची करावी. अधिकचे डबे वाढविल्यास प्रत्येक स्टेशनवरून चढणाऱ्या प्रवाशांना चढउतार करण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही, अशी मागणी प्रवासीवर्गातून होत आहे. आपल्या निर्धारित वेळेनुसार ही गाडी निजामाबाद येथून सकाळी साडेसहा वाजता निघते. निजामाबाद ते नांदेड या ११० किलोमीटरच्या अंतरासाठी या गाडीला तब्बल चार तासांचा वेळ लागतो.