प्रकाश राजेघाटगे
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेचा निकाल लागला आणि जांब (ता. खटाव) या छोट्याशा गावात एकच आनंदोत्सव सुरू झाला.याला कारणही तसेच होते.या गावचा ध्येयवेडा,अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेला सुपुत्र रवींद्र पवार याने कठोर परिश्रमाने आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून राज्य कर निरीक्षक म्हणून बहुमान पटकावला होता. पट्टयाने एकाच वर्षी चक्क ४ पदांना गवसणी घालण्यात यश मिळवले होते. निकाल हाती येताच गावाने कुटुंबाला डोक्यावर घेतले. रवींद्र उत्तम पवार हा जांब या अतिदुर्गम भागातील सर्वसामान्य कुटुंबातील व नाभिक समाजातील मुलगा.वडील उत्तम हे भाकरीचा अर्धचंद्र शोधण्यासाठी व दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी साताऱ्यातील एमआयडीसी मध्ये कामगार म्हणून काम करत आहेत तर आई सुनीता दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करत जीवन व्यतीत करत आहेत. या दाम्पत्यांना रवी व कन्या नीलम अशी दोन अपत्ये. कन्या सध्या सातारा येथील यशवंतराव चव्हाण कॉलेजमध्ये एमेस्सीच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे.
रवीचे दहावीपर्यंतचे शिक्षण हे जांबमध्ये झाले. दहावीत रवींद्रने कोणतीही खासगी शिकवणी न लावता ९३ टक्के गुण मिळवले तर बारावी सातारा येथील वायसी कॉलेजमध्ये करून ८० टक्के गुण मिळवले. सुरुवातीपासूनच शिक्षणात हुशार असलेल्या रवीने शिक्षणाचा एक एक टप्पा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केला. पुढं उच्चशिक्षणासाठी त्याने कराड येथील शासकीय महाविद्यालय गाठले आणि इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग मध्ये शिक्षण घेतलं. या शिक्षणावर त्याने एका नामांकित कंपनीमध्ये तीन वर्ष नोकरी देखील केली. दरम्यान, स्पर्धा परीक्षेची क्रेज पाहता आणि नोकरीत सुरक्षेच्या दृष्टीने विचार करून सरकारी नोकरदारच झालेलं बरं असे स्वप्न मनोमन बाळगून रवीने २०२१ पासून एमपीएसी परिक्षेची तयारी सुरू केली. परंतु, एक नाही.. दोन नाही.. तब्बल सात वेळा अवघ्या काही गुणांनी संधी हुकत होती पण पट्टयाने धीर न सोडता चिकाटी आणि ध्येय डोळ्यांसमोर ठेवून अभ्यास केला अन् सातव्या प्रयत्नांत यश खेचून आणलं . दरम्यानच्या काळात परीक्षेत एकामागून एक येणाऱ्या अपयशाने रवी चांगलाच परिपक्व बनला होता. हळूहळू स्पर्धा परीक्षेत सरळत आपल्या हुशारीची चुणूक त्याने दाखवायला सुरवात केली. पहिल्यांदा २०० पैंकी २०० गुण मिळवत तलाठी परीक्षा उत्तीर्ण झाला.त्यांनंतर लगेचच दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी विभागामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत आयटीआय कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून त्याची निवड झाली. त्यांनतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेत राज्यात १५ वे स्थान पटकावले तर त्यानंतर विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षेत (एसटीआय) राज्यात २० व्वा आला.
एव्हाना गरिबी पाचवीलाच पूजलेल्या उत्तम व सुनीता यांच्या पोटी जन्माला आलेल्या रवीने पांगच फेडला होता. वाघिणीचे दूध पचवून आपल्या लेकाने अधिकारी बनल्याची फोडलेली डरकाळी ऐकून उभयतांच्या डोळ्यातील आनंदाश्रू थांबायचं नाव घेत न्हवते. यावेळी उपस्थित असलेल्या सर्वांनीच रवींद्र व कुटुंबीयांनी केलेला संघर्ष डोळ्यासमोर ठेवून अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
" नियमित केलेला अभ्यास,आईवडिलांनी आम्हीं शिकून आपल्या पायावर उभं राहावे म्हणून केलेलं रात्रंदिवस काबाडकष्ट, व मित्रपरिवाराने दिलेल्या आर्थिक व मानसिक पाठबळामुळेच माझं अधिकारी बनण्याचं स्वप्नं साकार झालं. तथापि मला एवढ्यावरच थांबायचं नाही .अद्याप शासकीय सेवेत लांबचा पल्ला गाठून सर्वसामान्य कुटुंबाच्या कल्याणासाठी काम करण्याचं माझं स्वप्न आहे."-रवींद्र पवार.





Social Plugin