महावितरण कंपनीप्रती नागरिकात आक्रोश
निलेश कडू महाराष्ट्र ग्रामीण प्रतिनिधी
कारंजा: कधी सकाळीच, तर कधी दुपारी तर कधी मध्यरात्री अशाप्रकारे कुठलीही पूर्व कल्पना न देता कारंजा शहरातल्या अनेक भागातील वीजपुरवठा बऱ्याच वेळेपर्यंत खंडीत करण्यात येत आहे. त्यामुळे विजेवर चालणारे अनेक व्यवसाय प्रभावित होत असून, तथा रात्रीच्या झोपेचा पार खोळंबा होत आहे. विजेच्या या लपंडावामुळे व्यावसायीक व नागरिक महावितरण कंपनीप्रती आक्रोश व्यक्त करत आहे.
एरवी कारंजा शहरात महावितरण कंपनीकडून ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे वीजदर गगनाला भिडले असतानाही ग्राहक निमूटपणे ही दरवाढ सहन करत आहे. परंतु, गेल्या एका आठवड्यापासून शहरात सातत्याने विजेचा लपंडाव सुरू आहे. दिवस असो की रात्र अशा कुठल्याही वेळेत वीज पुरवठा बंद केला जात आहे. बरेचदा पाच ते दहा मिनिटातच वीज पूर्ववत होते. पण कधी कशी हा वेळ अर्धा ते एक तासावर पोचतो. सध्या उन्हाचा कडाका वाढला असून, विजेची मागणी दुप्पट, तिप्पट झाली आहे. कुलर, ऐसी वेगात सुरू झाले व पंखे जोराने फिरू लागले आहेत. शीतपेयांची दुकाने मोठ्या संख्येत सुरू झाली आहेत. अशास्थितीत वीज कंपनीने नागरीकांना सुरळीत वीज पुरवठा करणे अपेक्षित असताना याउलट केव्हाही वीज बंद केली जात आहे. त्यामुळे जनतेचा आक्रोश वाढत चालला आहे.
सध्या मुस्लिम बांधवांचा रमजान मास सुरू आहे. महिनाभर मुस्लिम बांधव ईदमध्ये जाऊन धार्मिक प्रार्थना करतात. वीजपुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने त्यांच्या धार्मिक प्रार्थनेत अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवात महावितरण कंपनीबद्दल नाराजीचा सूर आहे. वीज वितरण कंपनीने सुरळीतपणे वीज सेवा देऊन जनतेची गैरसोय दूर करावी अशी मागणी होत आहे.
कारंजा शहर आता बरेच विस्तारले आहे. त्या तुलनेत मात्र वीज रोहित्र कमी आहेत. शिवाय उन्हाळ्यामुळे सध्या शहरातून अचानक विजेची मागणी वाढल्याने रोहित्रावर ताण येत आहे. त्यामुळे वारंवार वीज रोहित्र जाळण्याचे प्रमाण वाढले असून, त्यापायी वीजपुरवठा खंडित होत आहे. - रेणुका वार्डेकर सहाय्यक अभियंता, महावितरण कारंजा





Social Plugin