Ticker

6/recent/ticker-posts

कुस्ती ठरली मैदान ठरलं पैलवान अजून ठरेना?


 बुध दि .[ प्रकाश राजेघाटगे ]

आज सातारा जिल्ह्यात यात्रा-जत्रेचे वातावरण आहे. यात्रा-जत्रा म्हटलं की, बैलगाडा शर्यत, कुस्ती इत्यादी खेळ गांव कुसाकडची माणसे मनोरंजनासाठी करतात तशीच यात्रा आता चालू झाली आहे ती म्हणजे पंचवार्षिक लोकसभा निवडणूक! या यात्रेसाठी कुस्तीचे मैदान ठरलेले आहे परंतु पैलवान अजून ठरलेला नाही. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम ठरला असून 19 एप्रिल ला निवडणूक नामांकन अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे; परंतु आज रोजी कुठल्याही राजकीय पक्षाची उमेदवारी घोषित झाली नाही; म्हणून म्हटलं की कुस्ती ठरली,मैदान ठरलं, पैलवान अजून ठरेना?

   काही दिवसांपूर्वी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम ठरलेला आहे. त्यानुसार 19 एप्रिल अर्ज भरण्याची शेवटचा दिनांक असून 7 मे ही निवडणूक तारीख आहे, त्यामुळे राजकीय पक्षांची उमेदवार घोषणा करण्याची लगबग चालू झाली आहे. परंतु गेल्या वेळी हाय व्होल्टेज ड्रामा ठरलेल्या सातारा लोकसभा निवडणुकीसाठी आज दिवसा अखेर कुठल्याही पक्षाने उमेदवारी जाहीर केलेली नाही, यावरूनच असे दिसते की येणारी सातारा लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे.

          गेल्या पाच वर्षातील महाराष्ट्र राजकारण म्हणजे निव्वळ मिसळीचा प्रयोग असेच म्हणावे लागेल. गेली 25 वर्षाची युती तोडून शिवसेनेने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. त्यानंतर भाजपाने शिवसेना व नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार बनवले. या घटनेनंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच सार्वत्रिक  निवडणुका होत आहेत. त्यामुळे कुठलाही राजकीय पक्ष पुरेपूर तयारीने या निवडणुकीत सहभाग घेण्याचा प्रयत्न करत आहे, त्याच अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील उमेदवार घोषित होण्यासाठी विलंब लागत आहे.

         गेल्या वेळी काँग्रेस आघाडीकडून लढलेले विद्यमान राज्यसभा खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले यांनी निवडून आल्यानंतर तीनच महिन्यात आपल्या खासदारकी पदाचा राजीनामा देऊन भाजपा कडून निवडणूक लढवली या त्यांचा धक्कादायक पराभव राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांच्याकडून झाला. सातारा येथील झालेले पावसाच्या सभेमध्ये वातावरण बदल होऊन जिल्हा तसेच राज्यातील राजकारणाला कलाटणी मिळाली असे जाणकार बोलतात परंतु आता परिस्थिती वेगळी आहे. श्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखाली असलेल्या महायुतीच्या सरकारमध्ये भाजपा बरोबर अजित पवार सामील झालेले आहेत. त्यामुळे सातारा लोकसभा निवडणूक आपण अत्यंत विश्वासाने जिंकू अशी आशा महायुतीच्या नेत्यांना झाली आहे; त्यामुळेच महायुतीचे जागा वाटप होऊन सुद्धा सातारचा उमेदवार अजूनही जाहीर झालेला नाही.

महायुतीच्या उमेदवाराचा गोळ मिटेना?

     राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट या मेळाव्यात उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी तावतावाने जाहीर केले की, सातारा लोकसभा निवडणूक ही आपल्या पक्षातर्फे लढवली जाणार आहे. परंतु गेल्या वेळी पराभूत झालेले खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले हे महायुतीकडून निवडणूक लढवण्याची इच्छुक आहेत,आणि येथेच घोळ निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री श्री अजित पवार हे कुठल्याही परिस्थितीत सातारा लोकसभेची जागा मित्र पक्षांना देण्यास तयारी दर्शवत नाहीत. वाई खंडाळा विधानसभा क्षेत्रातील आमदार श्री मकरंद पाटील यांचे बंधू व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष श्री नितीन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक आहेत. परंतु कोल्हापूर लोकसभेसाठी छत्रपती शाहू महाराज कॉंग्रेस तर्फे निवडणूक लढवणार असल्याने महायुतीची अडचण निर्माण झाली आहे. अगोदरच मराठा आरक्षणामुळे बॅक फुटवर गेलेल्या महायुती ला खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले यांना निवडणूक तिकीट नाकारणे अत्यंत जिकरीचे होऊन बसले  आहे.

 घरोघरी मातीच्या चुली

    महायुतीचा उमेदवार जाहीर झाला नाही त्याचप्रमाणे महाविकास आघाडीचा ही उमेदवार जाहीर झालेला नाही. देशाच्या राजकारणातील वस्ताद म्हणून ज्यांची ओळख आहे अशा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला सातारची उमेदवारी मिळणार आहे परंतु समोरील उमेदवार जाहीर होत नसल्याने पवार साहेबांनी ही आपली भूमिका गुलदस्तात ठेवलेली आहे. त्यामुळे येणारी सातारा लोकसभेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. शरद पवार यांच्याकडून श्री सारंग पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने व कोरेगाव तालुक्याचे माजी आमदार व विद्यमान विधान परिषद सदस्य आमदार श्री शशिकांत शिंदे प्रामुख्याने इच्छुक दिसत आहेत परंतु यात सर्वात शशिकांत शिंदे यांचे पारडे जड आहे त्यामुळे श्री शशिकांत शिंदे विरुद्ध महायुतीचे उमेदवार अशीच लढत होताना दिसत आहे.

वंचित व अपक्ष आणणार रंगत?

सन 2009 पासून लोकसभा निवडणूक लढवणारे व सध्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख शिंदे गट श्री पुरुषोत्तम जाधव याही वेळी निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. दोनच दिवसापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री शरद पवार यांची भेट घेऊन आपली निवडणूक लढण्याची निवडणूक इच्छा बोलून दाखवली असे खाजगीत चर्चा आहे. त्यामुळे श्री पुरुषोत्तम जाधव कुठल्याही परिस्थितीत सातारा लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. गेल्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणात वंचित फॅक्टरमुळे युतीचे उमेदवार आरामात निवडून आले आहेत. यावेळी श्री मारुती जानकर यांच्या माध्यमातून वंचित सातारा लोकसभेची निवडणूक लढत आहे त्यामुळे जर वंचित व शिवसेनेचे विद्यमान जिल्हाप्रमुख श्री पुरुषोत्तम जाधव हे जर का अपक्ष लढले तर निवडणूक एकदम चुरशीची होणार आहे पण या सर्वांची उत्तरे 22 एप्रिल पर्यंत आपणास मिळतील, तोपर्यंत जिल्ह्यातील सामान्य मतदार उमेदवार घोषित होण्याची वाट पाहत चर्चेत गुंतला आहे.