कीर्तीराज घुगे (प्रतिनिधी)
नाशिक - मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देत, साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यात आला. मांगल्याचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी उभारून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यात आले. शहर आणि उपनगरांमध्ये पारंपरिक वेशभूषेत नववर्ष स्वागत यात्रांचे आयोजन करण्यात आले होते. नववर्ष स्वागत यात्रेसाठी महिला, मुलांची लगबग, उत्सुकता आणि सर्वत्र चैतन्याचा बहर आला होता. सणानिमित्ताने रांगोळ्यांनी घर अंगण सजविण्यात आले होते. गुढीचे पूजन करण्यात आले. पुरणपोळी, श्रीखंड पुरी, बासुंदी आदी मिष्टान्नाचा नैवेद्य दाखविण्यात आला.
एकमेकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. नववर्षानिमित्ताने शहर आणि उपनगरांतील मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी झाली होती. सकाळपासून भाविकांनी दर्शन घेत नववर्षाचे स्वागत केले. पंचवटीतील राममंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नवीन वाहन मुहूर्तावर आणताना प्रथम मंदिरामध्ये पूजन करून घरी नेण्यात येत होते. त्यामुळे मंदिरांमध्ये कालिका माता मंदिर, गणपती मंदिरामध्ये नवीन वाहनाचे पूजन करण्यासाठीही गर्दी झाली होती. विविध गुढीपाडव्यानिमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन मंदिर व्यवस्थापनाकडून करण्यात आले होते. सामुदायिक वाचन, पठण, पूजन, आरती, अभिषेक, प्रसाद वाटप करण्यात आले. सणानिमित्ताने पारंपरिक वेशभूषा करीत शहराच्या सर्व भागातून ढोल पथकांसह शोभायात्रांमध्ये सहभागी होत असल्याने शहरात सकाळपासून उत्साहाचे वातावरण होते.
.png)




Social Plugin