Ticker

6/recent/ticker-posts

विसापूर ग्रामस्थांनी केले सेवानिवृत्त सैनिकाचे भव्य स्वागत

 


बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

    विसापूर ता खटाव या गावात ढोल ताशाच्या गजरात ३० वर्षे प्रदीर्घ आणि अविरत मातृभूमीची सेवा करून कॅप्टन प्रवीण सावंत यांना  सन्मानित करून  जंगी स्वागत करण्यात आले. संपूर्ण गावाचे वातावरण एका जल्लोषपुर्ण महोत्सवाचे झाले होते.या कार्यक्रमाला मित्रपरिवार , आजी माजी सैनिक संघटना विसापूर , सगे सोयरे  आणि त्यांच्या बटालियनचे सैनिक मित्र मोठया संख्येने उपस्थित  गावकर्यांनी  भारत माता की जय, वंदे मातरम च्या घोषणा देत मोठ्या उत्साहात भारत मातेच्या या सुपुत्राचे स्वागत केले.विसापूरातील एका सामान्य शेतकरी कुटुंबात  जन्मलेले कॅप्टन प्रवीण पतंगराव सावंत हे १ एप्रिल मार्च १९९४ पासून भारतीय सेनेच्या मेकानाइज्ड इंफ्रन्टरी मध्ये कार्यरत होते. शिपाई पदापासून पदोन्नती होत होत, त्यांनी उल्लेखनीय सैन्य सेवा केली आणि त्याबद्दल  त्यांना १५ ऑगस्ट २०२३ ला ऑनररी लेफ्टिनंट आणि त्यानंतर २६ जानेवारी २०२४ ला ऑनररी कॅप्टन या मानद पदावर पदोन्नती मिळाली. संपूर्ण विसापूर गावातील अशी मानद पदोन्नती मिळालेले ते प्रथम सैनिक आहेत .त्यांच्या बटालियन मध्ये ते पारंगत तज्ञ इन्स्ट्रक्टर म्हणून नवीन सैनिकांना प्रशिक्षण देत होते . सेवा निवृत्ती नंतर सुद्धा ते देशसेवेसाठी सदैव तयार आहेत असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. कॅप्टन प्रवीण पतंगराव सावंत यांनी कमावलेल्या संपूर्ण डेकोरेशन्स मेडल सहित सैनिकी गणवेश परिधान केला.सातारा जिल्ह्याला महान सैनिकी परंपरा आहे. लाखो सैनिक देश सेवा करून निवृत्त झाले आहेत. 

    राष्ट्रीय पातळीवर त्यांचा रोमांचक आणि गौरवपूर्ण इतिहास आहे. देशसेवेच्या या अखंड प्रवाहात अनेक तरुण , तरुणी आकर्षित होताना दिसत आहेत. सकारात्मक दृष्टीने अग्नीवीर म्हणून भारतीय सेनेत  रुजू व्हावे असे स्पष्ट मत कप्तान प्रवीण यांनी दिले.  आई वडिलांकडून लहानपणी घेतलेले संस्कार, गावातले शिक्षण, अथक परिश्रम आणि पत्नीची साथ  यांच्या बळावर मी उल्लेखनीय देशसेवा करू शकलो असे कप्तान प्रवीण अभिमानाने म्हणाले. यावेळी परिसरातील आमदार आणि खासदार यांचे हस्ते त्यांना पुष्पगुच्छ आणि शाल देऊन गौरव करण्यात आला. सायंकाळी सुंदर फुलांनी आणि तिरंग्याने सजवलेल्या  विशेष गाडीतुन ढोल ताशाच्या  गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत  गावाच्या मुख्य प्रवेश द्वारापासून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या प्रसंगी  स्त्रियांनी त्यांचे औक्षण केले. त्यांच्या समवेत मिरवणुकीत पत्नी सौ. मनीषा आणि दोन कन्या प्रणिता , दीक्षा  आणि बंधू  शिवाजी सावंत , रमेश सावंत , बहीण सौ. मनीषा यांनी ही उत्स्फूर्त सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच आजी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी सुभेदार (नि .)  गुलाबराव साळुंखे  आणि . हिंदुराव साळुंखे   किशोर साळुंखे , तानाजी शिंदे , उमेश सावंत  , ज्ञानेश्वर साळुंखे  व ग्रामस्थ उपस्थित होते . सुत्रसंचालन डॉ सुधीर सावंत यांनी केले तर आभार उमेश सावंत यांनी मानले.

यावेळी  विसापूरातील शहिद सैनिक स्व.शिपाई गणपत जिजाबा सावंत ,सोपानराव साळुंखे, स्व.सुभेदार श्रीरंग तात्याबा सावंत ,आणि स्व.सुभेदार विजय सर्जेराव शिंदे  , यांना  श्रद्धांजली वाहिली.