Ticker

6/recent/ticker-posts

अवैध धंद्यांविरोधात कारवाईची परिसरात चर्चा ठाणेदारांचा भल्या भल्यांना झटका


  


 सुनिल  बांगर  प्रतिनिधी 

दहीहांडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या अनेक वर्षापासून राजरोसपणे अवैध धंदे करणाऱ्यांना चांगलाच घाम फुटला आहे. दहीहांडा पोलिस ठाण्याचे ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे यांनी आपल्या पदाची सूत्रे हाती घेताच भल्याभल्यांना झटका देत आपला कारवाईचा धडाका सुरू ठेवला असून अवैध दारू विक्रेत्यांसह जुगार अड्ड्यावर धडक देत आपल्या कर्तव्यात कुठलाही कसूर न ठेवता गुन्हेगारांना ‘जेलवारी’’ घडवली. त्यामुळे दहीहंड्याचे ठाणेदार लय कडक आहे राजा ! अशी चर्चा चौहट्टा परिसरात सुरू आहे. 

अधिक माहितीनुसार, दहिहांडा पोलीस ठाणे परिसर हा संवेदनशील म्हणून ओळखला जातो.  या परिसरातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मागणी अनेक दिवसापासून नागरिक करीत होते. मात्र मागील अनेक वर्षात नागरिकांच्या या मागणीकडे तत्कालीन ठाणेदारांनी दुर्लक्ष केले असल्याचे बोलले जात आहे. मात्र आता पुरुषोत्तम ठाणेदार यांनी आपल्या पदाची सूत्रे हाती घेताच गुन्हेगारांविरोधात कारवाईचा धडाका लावला आहे. ठाणेदार ठाकरे यांनी दि. ७ एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ३ विविध अवैध दारू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करीत २ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच  काही दिवसांपूर्वी ४ जुगार अड्ड्यावर धाड टाकून ४ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर अवैध दारू विक्रेत्यांविरोधात ३७ कारवाया केल्या. त्यात ७२ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच २०० पेक्षा अधिक प्रतिबंधक कार्यवाही केली. 

कलम ११०, १०७ अंतर्गत कारवाई करत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार घडू नये यासाठी गुन्हेगारांवर तडीपारी अंतर्गत कारवाई केली.  दारूबंदी अधिनियम प्रमाणे कारवाई करत गुन्हेगारीवर आळा घातला आहे. विशेष म्हणजे गावागावांतील भांडणे विकोपाला जाऊ नये तसेच व्हॉट्स गुप च्या माध्यमातून चुकीचा मेसेज व्हायरल करुन तणाव निर्माण होऊ नये, यासाठी दहीहांडा पोलीस स्टेशन हद्दीतील प्रत्येक गावात कार्नर सभा घेऊन सायबर क्राईम व वाटसप ग्रुपच्या माध्यमातून चुकीचा मेसेज व्हायरल करने अशा प्रकारची जनजागृती करण्याचे तंत्र सध्या ठाणेदार यांनी अवलंबिले असल्याचे दिसून येत आहे. पेंडींग गुन्हांच्या थंड बस्त्यात असलेल्या फायलिंचाही निपटारा ठाणेदार करीत असल्याचे समजते. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी तसेच महीला तक्रारदार, त्यांच्यासोबत येणारी लहान मुले व अभ्यांगतांसाठी पिण्याच्या पाण्याची  अडचण लक्षात घेत ठाणेदार यांनी ठाण्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वखर्चाने उपलब्ध करून दिली असेसमजते.  अनेक वर्षापासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून देत अनेक फेरबदल केले. याचाच परिपाक म्हणजे या भागातील अवैध धंदे वाल्यांसोबत काही पोलिस कर्मचाऱ्यांचे असलेले सुमधुर संबंध संपुष्टात आल्याची या परिसरात चर्चा आहे. 

अवैध धंदे वाल्यांची यापुढे गय केली जाणार नाही : ठाणेदार ठाकरे

याबाबत ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे यांच्याशी संवाद साधला असताना त्यांनी सांगितले की, गावात शांतता  राहिली तरच गावचा विकास होतो. गावोगावी शांतता भंग करणारे तसेच अवैध धंदे वाल्यांची यापुढे गय केली जाणार नाही.  ते सुधारले नाही, तर त्यांना सरळ करण्यासाठी पोलिस सक्षम आहेत. चांगल्या लोकांना सोबत घेऊन सामाजिक स्वास्थ्य अधिक चांगले करण्याचा आमचा मानस आहे असे ठाणेदार ठाकरे यांनी सांगितले.