Ticker

6/recent/ticker-posts

शिवांजली पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणी संचालक व पदाधिकाऱ्यांवर आर्थिक जबाबदारी निश्चित



       महिनाभरात व्याजासह 14.61 कोटी भरण्याचे आदेश ठेवीदारांना दिलासा तर संचालकांचे धाबे दणाणले

-पाटण (दिनकर वाईकर) 

नाडे -नवारस्ता, ता. पाटण येथील शिवांजली ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या तथाकथित अपहार व आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी संस्थेचे संचालक व पदाधिकारी यांच्यावर 14.61 कोटीची आर्थिक जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. सदर रक्कम 30 दिवसांच्या आत 15 टक्के व्याजदाने भरण्याचे आदेश शिवांजली ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे प्राधिकृत चौकशी अधिकारी ऍड. समाधान ढाणे यांनी दिले असल्याची माहिती शिवांजली पतसंस्था ठेवीदार कृती समितीचे अध्यक्ष तसेच शेतकरी संघटना किसान मंचचे तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी दिली. दरम्यान, या कारवाईमुळे ठेवीदारांमध्ये समाधानाचे वातावरण असून संचालक व पदाधिकारी यांचे मात्र धाबे दणाणले आहे.

शिवांजली पतसंस्थेतील आर्थिक घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर सन 2020-21 या आर्थिक वर्षांचे लेखापरीक्षण सनदी लेखापरीक्षक संदीप सुतार यांनी दि. 2 मे 2022 रोजी विषेश अहवाल सादर करुन  संस्थेतील गंभीर आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आणले होते. त्यामुळे पाटण तालुक्यातील सुमारे 20 कोटी गुंतवणूक करणारे सुमारे पाच हजार ठेवीदार हवालदील झाले होते. या पार्श्वभूमीवर ठेवीदारांना दिलासा देवून या प्रकरणात लक्ष घालून ठेवीदांराना न्याय देणेच्या उद्देशाने शेतकरी संघटनेचे पाटण तालुका अध्यक्ष  प्रशांत पाटील यांनी या सर्व ठेवीदांराचे नेतृत्व करत संचालक व पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेवून समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. मात्र या सर्व घोटाळेबाज संचालक व पदाधिकारी यांनी हात वर केले.

यावेळी प्रशांत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला या  प्रकरणी दि.23 मे 2022 रोजी मल्हारपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले. वेळोवेळी सहकार विभाग पोलीस यंत्रणेशी समन्वय राखत या प्रकरणाचा पाठपुरावा केला. वेळो वेळी अधिकाऱ्यांशी समन्वय साधत प्रसंगी अंदोलन करत संबंधितांची सखोल चौकशी करुन संबंधितांवर आर्थिक जवाबदारी निश्चित करण्याची मागणी केली. त्यानुसार या संस्थेतील गैरव्यवहाराची चौकशी करणे कामी दि.17 जून 2022 रोजी सहाय्यक निबंधक पाटण यांनी ऍड. समाधान ठाणे यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमणूक केली. त्यानुसार प्राधिकृत अधिकारी यांनी दि. 1 एप्रिल 2024 रोजी सखोल चौकशी पूर्ण करुन आपला अहवाल सादर केला आहे.

त्याप्रमाणे पुढील दोषी संचालक व पदाधिकाऱ्यांवर आर्थिक जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये दादासाहेब रामचंद्र माथणे, जयंत नारायण देवकर, महिपती बबन भिसे, विनायक शंकर माथणे, अशोक यशवंत घाडगे (पाटील), तुकाराम ज्ञानू माथणे (सर्व रा. नाडे, ता. पाटण), शहनवाज मुबारक होबळे (रा. पाटण), युवराज अनंदराव पाटील (रा. शिंदेवाडी), चंद्रकांत कुंडलीक यादव (रा. पाटण), संपत दगडू पवार (रा. भारसाखळे), विजय नथुराम लुगडे (रा. पाटण), पार्वती शिवाजी भिसे (रा. नाडे) यांच्यावर प्रत्येकी 87 लाख 42 हजार 953 रुपये आणि व्यवस्थापक अभिजीत हणमंत देवकर (रा. चाफळ) याच्यावर 4 कोटी 11 लाख 89 हजार 958 रुपये अशा प्रक्रारे वरील प्रमाने 14 कोटी 61 लाख 05 हजार 367 एवढ्या रकमेची जबाबदारी निश्चित करून दि.31 मार्च 2021 पासून 15 टक्के दराने व्याजासह 30दिवसात रक्कम भरण्याचे आदेश करण्यात आलेले आहेत. तर देवकी शिवाजी दराडे (रा. नाडे) या मयत असल्याकारणाने त्यांच्यावरील जबाबदारी निश्चित नाही.

याप्रकरणी आरोपींवर आर्थिक जबाबदारी निश्चित करण्यात आल्यामुळे ठेवीदांरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात पाठपुराव्यास मदत करणारे बबनराव पवार, जयसिंग देसाई, अर्जून घाडगे, अभिजीत देसाई, काशीनाथ शिर्के, भगवान माथणे यांचेही ठेवीदांरानी आभार व्यक्त केले.

याप्रसंगी अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी सांगितले की, या अहवालाबाबतीत आम्ही पूर्ण समाधानी नसलो तरी भविष्यात या लोकांकडून रक्कम वसूल करून ठेवीदांराना त्यांच्या रकमा परत मिळवून देण्यासाठी ठेवींदार कृती समीती व प्रशासक मंडळ योग्य ती पावले उचलणार आहे. तसेच येणाऱ्या काळात शेेवटच्या ठेवीदारस पैसे मिळेपर्यंत या प्रकरणात योग्य ती कायदेशीर बाबी व पाठपुरावा करणार आहोत. तसेच आता कोणत्याही कर्जदारांची गय केली जाणार नाही. याबाबतीत ही कठोर भूमिका घेतली आहे. भविष्यात याबाबतीत महसुल विभागाकडून योग्य ते सहकार्य अपेक्षितआहे. अन्यथा ठेवीदांराचे रोषास सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

यावेळी प्रशांत पाटील यांनी जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी व सहाय्यक निबंधक पाटण व त्यांचे कर्मचारी यांचे विशेष आभार मानले.