आ. शशिकांत शिंदे; मतदारसंघातील प्रभाव पाहून व्यक्तीगत टीका
बुध , (प्रकाश राजेघाटगे) -
गेली २५ वर्षे राजकारण, समाजकारण करताना आम्ही अत्यंत कष्टाने आणि स्वाभिमानाने उभे राहिलाे आहे. आम्ही नेहमीच आमचा पक्ष व नेत्यांवर निष्ठा ठेवत सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावले आहेत. आमचा मतदारसंघातील प्रभाव पाहून आणि आमच्या कामावर काहीच बोलायला नसल्याने विरोधकांकडून रडीचा डाव खेळून आमच्यावर वैयक्तिक स्वरुपाचे खोटे आरोप सुरु केले आहेत. मतदारसंघातील जनता सुज्ञ असून विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही, असा ठाम विश्वास सातारा लाेकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे उमेदवार आ. शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
किकली (ता. वाई ) येथे मतदारांशी संवाद साधताना आ. शिंदे बोलत होते. ते पुढे म्हणाले शशिकांत शिंदे काय आहेत हे जनतेला माहित आहे. आम्ही कधीही स्वार्थ साधला नाही. संघर्षातून आम्ही उभे राहिलाे असून काही लाेक आम्हाला नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झालेली गर्दी पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. निवडणुकांमध्ये आरोप - प्रत्यारोप होत असतात. मात्र काही जण व्यक्ती द्वेषातून आमच्यावर खालच्या पातळीवर आरोप करत आहेत. शरद पवारांच्या तालमीत तयार झालाे असल्याने असल्या आरोपांना आम्ही घाबरणारे नाहीत. आम्हाला मतदारसंघातील जनतेचा विकास करायचा असून त्यामुळे आम्ही टीका टिपण्णी टाळून महत्वाच्या मुद्यांवर बोलणार आहे.
सध्या देशात, राज्यात असणाऱ्या सरकारकडून सर्वसामान्यांना नाहक त्रास दिला जात आहे. महागाइ, बेकारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सरकार उदासीन आहे. याउलट विरोधी पक्ष संपवण्याचे काम सरकारकडून होताना दिसत आहे. यंत्रणांचा गैरवापर करुन चुकीच्या पध्दतीने गुन्हे दाखल करुन विरोधकांना वेठीस धरण्याचे प्रकार होत आहे. मागील काही वर्षात जे काही घडले आहे ते जनतेने पाहिले असून जनतेनेच आता निवडणूक हातात घेतली आहे. गेली २५ वर्षांहून अधिक काळ मतदारंसघात काम केले असल्याने मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे. सातारा जिल्ह्यासह वाई तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने मला भरभरून प्रेम दिले आहे. ज्येष्ठ नागरिक,महिला, युवक यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे आ. शिंदे यांनी स्पष्ट केले.
किकली येथील श्री भैरवनाथ मंदिरात आ. शशिकांत शिंदे यांनी मनोभावे दर्शन घेत विधिवत पूजा केली. गावातील जेष्ठ मंडळींकडून शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान जांब (ता.वाई) येथे आ. शिंदे यांनी युवा सहकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी सध्याच्या राजकीय स्थितीपासून तर वाढती बेरोजगारी, नोकरभरती तसंच सर्वच तरुणाईमध्ये ज्याच्याबाबत तीव्र संताप आहे ते महापोर्टल अशा अनेक वेगवेगळ्या प्रश्नांवर आ. शिंदे यांनी आवाज उठवला. हे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देवू अशी ग्वाही त्यांनी दिली.भुईंज आणि ओझर्डे ग्रामस्थांच्या असणाऱ्या विकासकामांबाबत भूमिका जाणून घेत आगामी काळात निश्चितच पूर्ण केल्या जातील, असा विश्वास आ. शिंदे यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिला.
आ. शशिकांत शिंदे - मदन भोसले भेट
सातारा लोकसभा निवडणूक प्रचार निमित्ताने गुरुवारी सकाळी भुईंज येथे महालक्ष्मी देवीचे तसेच प्रभू श्रीरामाचे आ. शशिकांत शिंदे यांनी दर्शन घेतले. यावेळी महालक्ष्मीच्या चरणी जनसामान्यांची सेवा करण्याची संधी मिळो, अशी प्रार्थना व्यक्त केली. दादा जाधवराव यांच्या निवासस्थानी भेट देण्यासाठी आ. शिंदे गेले असता तेथे माजी आमदार मदन भोसले यांची भेट झाली. यावेळी उभयतांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली.
अपघाताने निवडून आलेल्यांकडून राजकारणाचा स्तर घसरवण्याचा प्रयत्न
सातारा जिल्ह्याला एक वेगळी परंपरा आहे. चांगल्या कामासाठी सत्ताधारी विरोधकांनी नेहमी एकत्र येवून काम केले आहे. मात्र काहीजण अपघाताने निवडून आल्याने त्यांना आपण काही तरी वेगळे असल्याचेच जाणवत आहे. सातारा जिल्ह्यात कधीही राजकारणाचा स्तर घसरला नव्हता मात्र गेल्या चार वर्षात व्यक्ती द्वेषातून टीका करत सुडाचे राजकारण करण्याचा काहींकडून प्रयत्न होत असल्याचा आरोप आ. शिंदे यांनी प्रचार दौऱ्यादरम्यान केला.





Social Plugin