बुध दि .[ प्रकाश राजेघाटगे ]
गेली 40 वर्षे झाली महाराष्ट्राचे राजकारण युती व आघाडी यामध्ये चालत आहे. विद्यमान लोकसभा निवडणुकीत भाजपा प्रणित महायुती व इंडिया आघाडी तर्फे महाविकास आघाडी अशा दोन राजकीय आघाडीत महाराष्ट्राचे निवडणूक धुमशान चालू आहे. महायुतीत असलेल्या भाजपातर्फे श्रीमंत खासदार उदयनराजे भोसले तर महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे आमदार श्री शशिकांत शिंदे सातारा लोकसभेसाठी नशीब आजमावत आहेत. राजकीय हेवे-दावे बाजूला सारून एकत्र आलेले सर्वपक्षीय राजकीय पुढारी आपली राजकीय भूमिका मांडताना भविष्याची तरतूद करतात असा लिखित नियम असल्यामुळे जरी युती
आघाडी झाली असली तरी नेत्यांचा सक्रियपणा जाणवत नसल्याची चित्र सध्या सातारा लोकसभा क्षेत्रात दिसून येत आहे.
सातारा लोकसभेसाठी महायुतीत असलेले तिन्ही पक्ष आपापल्या पक्षासाठी इच्छुक होते. भाजपातर्फे श्रीमंत खासदार उदयनराजे भोसले,माथाडी नेते नरेंद्र पाटील ,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री नितीन पाटील तर शिवसेनेतर्फे जिल्हाप्रमुख श्री पुरुषोत्तम जाधव अशा पुष्कळ इच्छुकांचा भरणा होता. यामध्ये भाजपाला तिकीट मिळाल्यानंतर इतर पक्षातील इच्छुक काहीसे नाराज दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वाईचे आमदार श्री मकरंद पाटील व त्यांचे बंधू जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री नितीन पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरताना उपस्थिती दाखवली असली तरी महायुतीच्या त्यांच्या अनुपस्थिती विशेष बाब होती. आता श्री छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिल्यानंतर जिल्ह्यातील अजित पवार गट जिल्हास्तरीय मेळावा घेऊन आपली भूमिका मांडणे गरजेचे होऊन बसले आहे नाहीतर युती होऊनही राजकीय मनोमीलन झाले नसल्याचे चित्र दिसून येणे फारसे आशादायी राहणार नाही.
शिवसेनेचे जिल्ह्याचे नियोजन पाहणारे पाटणचे आमदार , विद्यमान पालकमंत्री श्री शंभूराजे देसाई यांनी कराडाच्या महायुतीच्या मेळाव्यात बोलताना निवडणुकीत मायक्रोप्लनिंगची गरज असल्याचे वर्तवले. उदयनराजे भोसले यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली. मात्र पाटण तालुक्यात त्यांनी घेतलेल्या मेळाव्यास देसाई गटाला डावलले गेल्याचे तात्कालिक निमित्त पुढे करून उदयनराजे यांना अडचणीची ठरेल अशी एक पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. त्या पोस्टमध्ये शंभूराज देसाई यांच्या घराबाहेरील उदयनराजेंचे भव्य तैलचित्र तसेच साताऱ्यात लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकाला सुरुवातीला झालेला विरोध याचा उल्लेख आहे. या पोस्टचा मास्टर माईंड कोण हे उघड गुपित असल्याचे बोलले जात आहे.*वरवर ची माया अन उपाशी निज ग बया* अशी अवस्था जिल्ह्यातील शिंदे गटातील कार्यकर्त्यांची झाली आहे. नियोजन अभावी संघटना निवडणुकीला सामोरे जाणे धोक्याचे आहे हे माहीत असून सुद्धा जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांमध्ये एकोपा दिसत नाही आणि इच्छुक जिल्हाप्रमुख श्री पुरुषोत्तम जाधव यांचा रुसवा अजून काही गेलेला दिसत नाही.
सातारा तालुक्यातील मनोमीलन हा संपूर्ण महाराष्ट्रात एक चर्चेला गेलेला विषय आहे. विद्यमान उमेदवार श्री उदयनराजे व त्यांचे बंधू आमदार श्री शिवेंद्रराजे भोसले यांचे राजकीय वितुष्ट सर्वांना माहीत आहे. आता दोन्ही बंधू जरी भाजपामध्ये असले तरी त्यांच्या मतांची टक्केवारी येत्या निवडणुकीत दिसून येणे अत्यंत गरजेचे आहे. श्री छत्रपती सौ.वेदांतिका राजे यांचा नगरपालिकेच्या निवडकणुकीमध्ये झालेला पराभव विसरून आमदार गटाने काम केले तरच येणाऱ्या निवडणुकीमध्ये श्री उदयनराजे भोसले यांचा विजयाचा मार्ग सुकर होईल अन्यथा निवडणुकीची धुमसचक्री जोरदार होईल.
जी अवस्था महायुती मध्ये आहे,तीच अवस्था महाविकास आघाडीमध्ये सुद्धा दिसून येत आहे. यामध्ये सर्वात जास्त फटका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटात दिसत आहे. जिल्हातील सर्वात विस्कळीत झालेल्या या संघटनेत अजूनही एक एजन्सीपणा दिसून येत नाही. जिल्ह्याचे संपर्कप्रमुख असलेले श्री शेखर भाऊ गोरे अजूनही एकाही मीटिंगसाठी उपस्थित राहिलेले दिसले नाहीत. उर्वरित जिल्हाप्रमुख फक्त आपल्या तालुक्यासाठी थोडेफार नियोजन करताना दिसत आहे याचा फटका निश्चितच महाविकास आघाडीला बसू शकतो.
काँग्रेस तयारी जरी जेमतेम असली तरी,भक्कमपणे महाविकास आघाडीच्या पाठीमागे आहे.तर कृष्णा खोरे विकास महामंडळाचे . उपाध्यक्ष, आ.श्री.महेश शिंदे,मनोज घोरपडे, अतुल भोसले, धैर्यसिल कदम , मुळपक्षीय भाजपा व सलंग्न संघटना श्री.छ.उद्ययनराजे यांच्या विजयासाठी अथक प्रयत्न करताना दिसत आहेत.
सातारा जिल्हा मा.श्री.शरद पवार यांचे नेतृत्व नेहमीच मानत आला आहे.परंतु पक्षफुटीनंतर ही पहिली निवडणूक असल्या कारणाने ते पक्षाच्या विजयासाठी अथक प्रयत्न करतील हे नक्की आहे.पवार साहेबांप्रमाणे छञपती उदयनराजे यांचाही जिल्ह्यात एक मोठा चाहता वर्ग आहे;युवकांचे आँयडाँल आहेत त्यामुळे त्यांनी ही प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे.हे सर्व जरी खरे असले तरी,युती व आघाडीचे जे मिञ प्रामाणिकपणे काम करतील तोच उमेदवार विजयाकडे भक्कमपणे वाटचाल करेल हे निश्चित,...





Social Plugin