Ticker

6/recent/ticker-posts

महापालिकेकडून प्राथमिक स्तरावर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामाला सुरुवात


कीर्तीराज घुगे (प्रतिनिधी)

नाशिक - नाशिकमध्ये २०२७ - २८ या वर्षात सिंहस्थ कुंभमेळा होणार असून तयारीला अवघे तीन वर्ष उरले आहे, त्यामुळे महापालिकेकडून प्राथमिक स्तरावर कामाला सुरुवात झाली आहे. शासनानेही त्यासाठी समित्या गठित केल्याने कामाला गती आली आहे.

त्याच अनुषंगाने सिंहस्थ कुंभमेळ्यात यंग फ्रेडंस असोसिएशन या संस्थेने प्रयागराज या ठिकाणी केलेल्या कुंभमेळा नियोजनाचे सादरीकरण मंगळवारी दि. २ एप्रिल रोजी महापालिकेत केले. मनपा अतिरिक्त आयुक्त प्रदिप चौधरी, शहर अभियंता शिवकुमार वंझारी, अधीक्षक अभियंता संजय अग्रवाल यांच्या उपस्थितीत या संस्थेने सादरीकरण केले. देशात नाशिकसह उज्जैन, हरिद्वार व प्रयागराज या ठिकाणी कुंभमेळा भरतो. पण वरील ठिकाणी नदीचे पात्र मोठे असून घाटही प्रशस्त आहेत. 

त्यामुळे गर्दी नियंत्रणात राहते. याऊलट गोदावरी मुख्य शहरातून वाहत असून तिचे पात्र छोटे आहे. नदिकडे येणारे रस्तेही प्रचंड अरुंद असून या अगोदर चेंगराचेंगरिची दुर्घटना घडली आहे. त्यामुळे इतर ठिकाणांच्या तुलनेत नाशिकची भौगोलिक परिस्थिती भिन्न असल्याने गर्दी नियंत्रणांसह इतर बाबींवर काम होणे गरजेचे आहे. त्यावर या संस्थेने फोकस करत कुंभमेळ्याचे नियोजन कसे शक्य आहे याबाबत सादरीकरण केले. महापालिका आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला लागली असून कामाला सुरुवात केली आहे.