Ticker

6/recent/ticker-posts

वीज कंपनीच्या सबस्टेशनवर जमावाचा हल्ला



कीर्तीराज घुगे (प्रतिनिधी)

नाशिक - इंदिरानगर येथील वीज सबस्टेशनवर रात्री वीजपुरवठा खंडित झाल्याने संतप्त जमावाने दगडफेक करत आपला राग व्यक्त केला. या दगडफेकीनंतर या ठिकाणी असलेले कर्मचारी शेखर कापडणीस आणि रखवालदाराला देखील धक्काबुक्की केल्याचे समजते. 

तांत्रिक दुरुस्तीसाठी वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिक कमालीचे संतप्त होते.संतप्त झालेल्या नागरिकांनी अचानक या सबस्टेशनवर दगडफेक केली. येथील सर्व कर्मचारी आणि अधिकारी केबल नादुरुस्त झालेल्या ठिकाणी कामासाठी गेले होते. यावेळी कापडणीस हे एकटेच एका रखवालदारासोबत तेथे होते. अचानक झालेल्या या प्रकाराने ते देखील घाबरून गेले. जमावाने अंधाराचा फायदा घेऊन त्यांना देखील मारहाण केल्याचे वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. दरम्यान या प्रकारची घटना पहिल्यांदाच परिसरात झाल्याने आसपास पळापळ झाली होती. रात्री उशिरा याबाबत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.