Ticker

6/recent/ticker-posts

खटाव पंचायत समितीचे कार्य गतिमान- मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन.



 बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

शिक्षण, आरोग्य, ग्रामपंचायत, कृषी, जलजीवन तसेच नरेगा अशा सर्व विभागातील विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीत खटाव पंचायत समितीचे कार्य गतिमान असल्याचे गौरवोद्गार सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी काढले.  बचत सभागृह वडूज येथे संपन्न झालेल्या मॉडेल स्कूल,  स्मार्ट पी. एच. सी. तसेच विविध योजनांच्या आढावा बैठकीस मार्गदर्शन करताना श्रीमती नागराजन बोलत होत्या. 

 बैठकीच्या सुरुवातीस वटपौर्णिमा सणाच्या औचित्याने  वडाचे रोप देऊन गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नागराजन यांचे स्वागत केले तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांचे स्वागत गटशिक्षणाधिकारी प्रतिभा भराडे यांनी केली. 

आढावा बैठकीमध्ये प्रथम मॉडेल स्कूल व स्मार्ट पी. एच. सी. याबाबतचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी पी. पी. टी. च्या माध्यमातून आदर्श शाळेचे सादरीकरण व मार्गदर्शन स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन व गटशिक्षणाधिकारी प्रतिभा भराडे यांनी केले.

 सातारा जिल्हातर्गत  एकूण 223 शाळांना मॉडेल स्कूल बनवण्यात येणार असून यामध्ये खटाव तालुक्यातील 21 शाळांचा समावेश आहे. खटाव तालुक्यात शिक्षण विभागामार्फत  पथदर्शी कार्य होत असून यासाठी प्रशासनाला तालुक्यातील शाळा व्यवस्थापन समिती व सरपंच यांचे मोठे सहकार्य लाभत आहे. मॉडेल स्कूल अंतर्गत विविध गुणवत्तापूर्ण भौतिक सुविधा उभ्या करताना या सर्व घटकांनी एकजुटीने काम करण्याविषयीचे आवाहन यावेळी करण्यात आले.

 गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जलजीवन मिशन योजनेच्या अंमलबजावणीत खटाव तालुका जिल्ह्यात आघाडीवर असून नरेगा अंतर्गत एकूण 576 हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करून खटाव तालुका सातारा जिल्ह्यात सर्वाधिक बांबू लागवड करणारा तालुका ठरला आहे. याबद्दल गटविकास अधिकारी पाटील यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. यावेळी मौजे मोराळे गावच्या वैशिष्ट्यपूर्ण बांबू लागवडीचा विशेष उल्लेख करण्यात आला.  आढावा बैठकी दरम्यान  तालुक्यात प्रभावीपणे  काम करणारे ग्रामसेवक यांचाही नागराजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच सर्व विभागप्रमुख यांचे ही विशेष कौतुक करण्यात आले. 

  सदर आढावा बैठकीस सर्व विभागांचे विभाग प्रमुख, विविध गावचे सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी आदि विविध मान्यवर उपस्थित होते.