बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या व गरीब कुटुंबातील गरजू मुलांना सनदी अधिकारी होण्याची संधी मिळावी, यासाठी येथील श्री सेवागिरी सांस्कृतिक भवन येथे डी. एन. जाधव फाऊंडेशन संचालित श्री सेवागिरी महाराज अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याचा उद्घाटन समारंभ सोहळा रविवारी (दि. २३) सकाळी १०.३० वाजता श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती १०८ प. पू. श्रीमहंत सुंदरगिरी महाराज, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन तथा पुणे विभागाचे माजी आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते होणार आहे.कार्यक्रमास माजी कामगार आयुक्त तथा डी. एन. जाधव फाऊंडेशनचे चेअरमन सुरेश जाधव, मुंबई एमआयडीसीचे मुख्य अधिकारी पी. डी. मलिकणेर, नगरपालिका प्रशासन महाराष्ट्र राज्याचे आयुक्त तथा संचालक मनोज रानडे, केंद्रीय महसूल विभागाचे उपायुक्त नासिर मणेर, सँडोज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे कार्यकारी संचालक सुधीर भंडारे, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव वैभव राजेघाटगे, ठाण्याचे उपजिल्हाधिकारी विश्र्वास गुजर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या अभ्यासिकेत ९६ विद्यार्थी एकावेळी बसू शकतात. सकाळी सहा ते रात्री बारा ही अभ्यासिका सुरू असणार आहे. मार्गदर्शनासह शिक्षणाच्या सर्व अत्याधुनिक सुविधांनी हे स्पर्धा परीक्षा केंद्र व अभ्यासिका परिपूर्ण असणार आहे. हे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र राज्यात आदर्शवत करण्यासाठी श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट व डी. एन. जाधव फाऊंडेशन सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती, माजी कामगार आयुक्त सुरेश जाधव, श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन रणधीर जाधव, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, संतोष उर्फ बाळासाहेब जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव यांनी दिली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांत अत्युच्च गुणवत्ता असते. मात्र अवाढव्य शुल्कामुळे अनेक विद्यार्थ्यांना शहरातील स्पर्धा परीक्षा केंद्रात जाऊन अभ्यास करणे शक्य होत नाही. या अभ्यास केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शहराच्या दर्जाच्या सर्व भौतिक सुविधा आणि अधिकाधिक चांगले मार्गदर्शन आपल्या भागातच मिळणार आहे. येथील मुले मोठ्या पदावर गेली पाहिजेत हा या अभ्यास केंद्राचा मुख्य हेतू आहे. - रणधीर जाधव, चेअरमन श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट





Social Plugin