बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
डिस्कळ येथील श्री.शिवाजी विद्यालयात पाठ्यपुस्तक व शैक्षणिक साहित्यासह नवागतांना स्कूल बॅगेचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शालेय दफ्तर ( स्कूल बॅग ) व पाठ्यपुस्तक मिळाल्याने नवागत विद्यार्थ्यांचे चेहरे हरखून गेले.
शैक्षणिक वर्ष 2024 - 2025 च्या प्रथम सत्राचा प्रारंभ झाला. शनिवार असल्याने सकाळी विद्यालयाचे प्रांगण गजबजून गेले. साडे सात वाजता विद्यार्थी व शिक्षक विद्यालयात उपस्थित होते. राष्ट्रगीतासह प्रार्थनेनंतर विपश्यना ध्यान घेण्यात आले. त्यानंतर प्रत्येक इयत्तेतील नवागत विद्यार्थी व उपस्थित सर्व विद्यार्थी व मान्यवरांचे स्वागत करण्यात येऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. मान्यवरांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांना दफ्तरासह पाठ्यपुस्तक व गुलाबपुष्प देण्यात आली. विद्यालयाच्या नूतनीकरणासाठी योगदान दिलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या पालकांना यावेळी निमंत्रित करण्यात आले होते.
याप्रसंगी विष्णू कर्णे ( गुरुजी ) ,अशोकराव गोडसे ( बापू ) , विद्यालयाचे सेवानिवृत्त कर्मचारी सखाराम कर्णे, श्रीमती वृषाली सुतार , वामन घनवट , अजय शिपटे, गणेश सुतार , निलेश भुजबळ, पै.अशोक मदने, सौ.मनिषा कर्णे , सौ.मनिषा सुतार , सौ.मेघा जाधव सौ.जिजाबाई मदने , भाऊसाहेब निकम आदींची उपस्थिती होती. मुख्याध्यापक आर.एम.डांगे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. विद्यालयाच्या विविध उपक्रमाचे कौतुक करुन श्री.विष्णू कर्णे ( गुरुजी ) म्हणाले, " नूतनीकरणाच्या कामामुळे शाळेची इमारत लक्षवेधी झाली असून येथील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी चमकदार कामगिरी करत आहेत हे कौतुकास्पद आहे. पालकांनी सजग होणे गरजेचे असून विद्यार्थी , शिक्षक व पालकांचा समन्वय महत्वाचा आहे. यावेळी उपशिक्षक विलास काटकर यांनी मनोगत व्यक्त केले. श्री.सुनील वायदंडे यांनी आभार मानले. पुणे येथील सेवा सहयोग फौन्डेशनतर्फे शालेय साहित्यासह विद्यार्थ्यांना स्कूल बॅगा ( दफ्तर ) देण्यात आले. त्याबद्दल सेवा सहयोग फौन्डेशन तसेच तालुका समन्वयक जितेंद्र शिंदे यांचे कौतुक करुन आभार मानण्यात आले. शालेय पोषण आहारासह मिष्टान्न म्हणून जिलेबी चे वाटपही विद्यार्थ्यांना करण्यात आले. श्री.अविनाश जंगम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.





Social Plugin