Ticker

6/recent/ticker-posts

कोयना धरणात ७०.९६ टीएमसी पाणीसाठा.



 चोवीस तासात ४.७९ टीएमसी, पाणीउंचीत ५.५  फुटाने वाढ. पायथा वीजगृहातून प्रतिसेकंद  १,०५० क्युसेक्स विसर्ग. कोयना नदीच्या पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा.


पाटण ( दिनकर वाईकर  ) 

कोयना धरणांतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर परिसरात दमदार पाऊस पडत आहे. छोट्या नद्या, नाले, ओढ्यांमधून प्रतिसेकंद सरासरी ५५,५२२ क्युसेक्स पाण्याची आवक होत असल्याने धरण पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. आगामी काळातील पाऊस, धरणाची एकूण साठवण क्षमता लक्षात घेता खबरदारी म्हणून धरणाच्या पायथा वीजगृहातील २० मेगॅवॅट क्षमतेचे एक जनित्र सुरू असून या जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद १,०५० क्युसेक्स पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पूर्वेकडील विभागातील पाऊस व धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाल्याने  नदीकाठची गावं, लोकवस्त्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

      धरणाच्या एकूण १०५.२५ टीएमसी पाणीसाठ्यापैकी आता ७०.९६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी यापुढे ३४.२९ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे.

    धरणात सध्या ७०.९६ टीएमसी उपलब्ध तर ६५.८४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा असून मागील चोवीस तासात धरण पाणीसाठ्यात ४.७९  टीएमसीने तर पाणी उंचीत ५.५ फूट वाढ झाली आहे. सध्या समुद्रसपाटीपासून धरणाची पाणी उंची २१३१ फूट असून जलपातळी ६४९.५२९ मीटर इतकी आहे. मंगळवार संध्याकाळी पाच ते बुधवार संध्याकाळी पाच या चोवीस तासात व आजपर्यंतचा एकूण पाऊस कोयना १६८ मिलिमीटर ( २९६१ ), नवजा २२६ मिलिमीटर ( ३४९१ ) तर महाबळेश्वर मिलिमीटर  १९० ( २८९२ ) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात सध्या ६७.४२ टक्के पाणीसाठा झाला आहे.


कोयना ते नवजा रस्ता खचला...

दरम्यान, पाटणसह कोयना विभागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणचे रस्ते खचले असून झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र पाटणच्या प्रशासनाने तात्काळ संबंधित ठिकाणी उपाययोजना राबवल्याने गैरसोय दूर झाली. कोयना विभागातील मौजे कामरगावमधील पाबळ नाल्याजवळ कोयना ते नवजा रस्ता खचल्याने या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. सदर ठिकाणी बांधकाम विभागाकडून मुरूम टाकून त्याठिकाणी बॅरिकेटस लावण्यात आले आहे. येथील वाहुतक एका बाजूने सुरू आहे. अशा प्रकारे तालुक्यात कोणतीही घटना घडल्यास तात्काळ प्रशासनास कळवावे, असे आवाहन तहसिलदार अनंत गुरव यांनी केले आहे.