Ticker

6/recent/ticker-posts

पाटण ते कोयनानगर रस्त्याची दुरावस्था


पाटण (दिनकर वाईकर) 

म्हावशी फाटा ते कोयनानगर दरम्यान रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. याची तात्काळ दुरुस्ती करावी, पाटण ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना सर्व सुविधा मिळाव्यात व पाटण नगरपंचायतीत कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्यांची नेमणूक व्हावी, अशा मागण्यांचे निवेदन पाटण तालुका काँग्रेस समितीच्यावतीने पाटणचे प्रांताधिकारी सुनील गाडे यांना देण्यात आले. यावेळी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस नरेश देसाई, पाटण तालुका सरचिटणीस अॅड. राजन भिसे, पाटण शहराध्यक्ष दर्शन कवर, अनुसूचित जाती सेलचे तालुकाध्यक्ष आनंदा कांबळे, जिल्हा सदस्य हमीद मुकादम, जेष्ठ कार्यकर्ते माधव माने, विठ्ठल बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पाटण ते कोयनानगर रस्त्याची दुरवस्था

निवेदनात ते म्हणतात, पाटण ते कोयनानगर या रस्त्यावर वाहनांची सतत वर्दळ असून सदरचा रस्ता पावसाने अनेक ठिकाणी उखडून मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतूक करणे अशक्य झाले आहे. वाहनांचेही प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे सदर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे.

        कायमस्वरूपी मुख्याधिकारी नेमावा

पाटण नगरपंचायतीत कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने नागरिकांची अनेक कामे खोळंबली आहेत. नागरिकांना शासकीय, शैक्षणिक, बांधकाम व अन्य कामांसाठी दाखले मिळविण्यात अडचणी येत आहेत.त्यामुळे येथे कायमस्वरूपी मुख्याधिकारी नेमणूक करण्यात यावी.

                     पाटण ग्रामीण रुग्णालयात अपुरे कर्मचारी व रुग्णांची गैरसोय

पाटण ग्रामीण रुग्णालयात तालुक्याच्या विविध भागातून लोक उपचारासाठी येत असतात. मात्र त्यांच्यावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसतात. अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. येथील कर्मचाऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागत आहे. त्यामुळे पुरेसे कर्मचारी नेमून याठिकाणी आवश्यक सोयी उपलब्ध करून जनतेची होणारी गैरसोय दूर करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, सातारा, तहसीलदार, पाटण, उपअभियंता, पाटण, आयुक्त नगर प्रशासन विभाग, सातारा यांना देण्यात आल्या आहेत.

मंजूर कामात कोणी घातला खोडा?

गेल्या वर्षी या रस्त्याच्या कामासाठी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालय विभागाने सुमारे २१२.४९ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी देत रस्त्याच्या नुतनीकरण कामास मंजुरी दिली होती. त्यावरून लोकप्रतिनिधीत श्रेयवाद झाला. मात्र ते काम का खोळंबले? असा प्रश्न यावेळी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस नरेश देसाई यांनी विचारला.