Ticker

6/recent/ticker-posts

रुग्णांसाठी गोल्डन अवर ट्रिटमेंट महत्वाची

       डॉ. सुधाकर लावंड ; डॉ. सोहम लावंड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आरोग्य शिबीर         

   बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

गंभीर रुग्णांसाठी तत्परता दाखवून देण्यात येणारी गोल्डन अवर ट्रिटमेंट खूप महत्वाची ठरते. कोणत्याही आजाराचे लवकर निदान आणि त्यावरील अचूक इलाजाने अनेकांचे प्राण वाचवता येतात असे प्रतिपादन डॉ. सोहम लावंड चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुधाकर लावंड यांनी केले. समतोल आणि सकस आहार, योग्य व्यायाम, प्राणायाम करुन सर्वांनीच आपापले आरोग्य सांभाळावे असा सल्लाही त्यांनी दिला.

    खातगुण येथे डॉ. सोहम लावंड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबीरात ते बोलत होते.  डॉ. लावंड पुढे म्हणाले, आजाराचे निदान लवकर झाले तर वेळेतच योग्य उपचार करता येतात. ग्रामीण  भागातील रुग्णांपर्यंत पोहचून त्यांच्या आजाराचे लवकर निदान करण्यासाठी सदर शिबीर नेहमीच आयोजित करण्यात येते. ट्रस्टकडून रिमांड होमला देणगी, शाळांना डिजिटल बोर्ड्स, गणवेश, जलसंधारण अशी विधायक कामे केल्याचेही त्यांनी  सांगितले.  

    शिबीरात डॉ. सुधाकर लावंड यांच्यासह डॉ. शृती लावंड ( थोपटे ), डॉ. शिवम लावंड, डॉ. सायली लावंड, डॉ. शैलेंद्र डुबल, डॉ. उत्कर्षा ढाणे यांनी २५४  रुग्णांची तपासणी केली. दिडशेवर रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी करुन चष्मे वाटप करण्यात आले. १२ रुग्णांचे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया मोफत करुन दिली जाणार आहे.  शिबीरात रुग्णांच्या आजारांचे निदान करुन मोफत औषधे देण्यात आली. अविनाश पिसाळ आणि संजीवन हॉस्पिटलच्या स्टाफने सहकार्य केले. डीवायएसपी विवेक लावंड यांनी आभार मानले. खातगुण ग्रामस्थांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.