Ticker

6/recent/ticker-posts

हिरवे शिवार शिवार , नभी दाटला पाऊस सुखावला बळीराजा , सुखावली धरती माय


प्रतिनिधी आकाश जळके

    गतवर्षी अंबड तालुक्यात तीव्र दुष्काळ होता . यावर्षी मात्र  वरूनराजाची काही अंशी मेहरबानी दिसत आहे . अंबड तालुक्याचा सरासरी पाऊस 595 मिलिमीटर आहे . जून पासून आतापर्यंत तालुक्यात 212 मिलिमीटर पाऊस व्हायला पाहिजे . त्या तुलनेत थोडा अधिक म्हणजे 255 मिलिमीटर पाऊस झालेला आहे .

मंडळनिहाय पावसाचा विचार केला असता आज पावेतो सर्वाधिक पाऊस अंबड मंडळात 336 मिलिमीटर इतका झालेला असून सर्वात कमी पाऊस वडीगोद्री मंडळात 193 मीटर झालेला आहे . एकंदरीत तालुक्यात 255 मिलिमीटर इतका पाऊस झालेला आहे . त्यामुळे शेतकरीराजा सुखावलेला दिसून येतो. मागील दोन दिवसापासून तालुक्यात सर्वत्र कमी जास्त स्वरूपात पाऊस पडत आहे . तथापि पावसाचा वेग असाच कायम असला पाहिजे अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे .

    पावसाळयात सृष्टी जशी हिरवीगार होते तशी शेतक-यांची लगबग कमालीची वाढते . ही गेल्या शतकानुशतकाची परंपरा आहे . वर्षगणिक यात बदल होत गेले असले तरी शेतीचा मूळ ढाचा कायम आहे . पूर्वी बैलांबरोबर शेतीत वावरण्यासाठी माणसांची जत्राच फुलायची . एकदा का पाऊस सुरू झाला की शेत गजबजून जायचे . आज ही स्थिती नाही . शेतातून घेण्यात येणारे उत्पन्न कमी जास्त होत आहे . 

     जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी सुरुवातीपासूनच बोगस बियाणे विक्री होणार नाही यासाठी विविध उपाययोजना केल्या होत्या . काही ठिकाणी स्वतः भेटीही दिल्या होत्या . शेतकऱ्यांप्रती संवेदनशील असलेल्या अपर जिल्हाधिकारी रीता मेत्रेवार ह्या नेहमी सर्व तहसीलदार यांना फोनवरून पाऊसमान कस आहे , शेतकऱ्यांच्या काही समस्या आहेत किंवा कसे याबद्दल आढावा घेत असतात . निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ हे नैसर्गिक आपत्ती असतील , शेतकरी आत्महत्या असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील याबद्दल नेहमी सजगतेने सूचना देत असतात . अंबडचे उपविभागीय अधिकारी कार्यालयात येणाऱ्या शेतकऱ्यांशी सौजन्याने वागावे , शेतकऱ्यांच्या समस्या सोडवून घ्याव्यात यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात . त्या अनुषंगाने बैठकीत मंडळ अधिकारी व तलाठी यांना सूचना देत असतात . अंबड तालुक्यात 100% पेरणी झाल्याचे तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी यांनी नमूद केलेले आहे . तालुक्यात 138 गावे असून लागवडीखालील क्षेत्र 84125.62 हेक्टर इतके असून सर्वाधिक कापसाची लागवड 54 हजार 881 हेक्टरवर झाल्याचे त्यांनी सांगितले .त्या खालोखाल सोयाबीन 16720 हेक्टरवर , तूर 10603 हेक्टरवर तर खरीप बाजरीची 1521 हेक्टरवर पेरणी झाल्याचेही त्यांनी नमूद केले .

        पावसाची सलगता कायम राहिली, मोठे खंड पडले नाही तर यावर्षी पिक पाणी चांगले होऊ शकते अशी शेतकऱ्यात चर्चा आहे .

अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांचे अनुदानाचे प्रश्न बहुतांशी मिटले असून शेतकऱ्यांना रस्त्याच्या अनेक अडचणी निर्माण होत आहेत, त्याही मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यामार्फत मार्गी लावण्यात येत असल्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले . तसेच कोणालाही अडचण असल्यास माझ्याशी संपर्क साधावा असेही त्यांनी यावेळी प्रकर्षाने नमूद केले .