Ticker

6/recent/ticker-posts

"पाड्यावरचा टिल्ल्या" कादंबरीची विद्यापीठीय अभ्यासक्रमात निवड.



तालुका प्रतिनिधी: शंकर निंबारे 

नाचलोंढी | त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसुल जवळील ग्रामपंचायत नाचलोंढी पैकी चिंचपाडा येथील लेखक तुकाराम चौधरी यांची 'पाड्यावरचा टिल्ल्या' ही कादंबरी कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संलग्नित महाविद्यालयांमध्ये  एम.ए. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाली आहे. यापूर्वी ही कादंबरी स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, तसेच डॉ. होमी भाभा स्वायत्त विद्यापीठ मुंबई येथे अभ्यासक्रमासाठी निवडली गेली होती. सदर कादंबरीस विविध संस्था संघटनांचे पुरस्कार लाभले असून वाचकांचीही सदर कादंबरीस पसंती लाभली आहे. सदर कादंबरीतील कथानक हे आदिवासी जीवनावर असून एका सुशिक्षित बेरोजगार आदिवासी युवकाची संघर्षगाथा यात मांडली आहे. आदिवासी ग्रामीण भागातल्या मुलांसाठी शासनाने काढलेल्या शासकीय आश्रम शाळेतली गचाळ व्यवस्था, तिथला भ्रष्ट्र कारभार, शिक्षणाची दैनावस्था, आश्रम शाळांमध्ये मुलींचे होणारे लैंगिक शोषण, सर्प दंशाने होणारे मुलांचे मृत्यू अशा समस्यांचे प्रसंग मांडून आदिवासी ग्रामीण भागातून रोजगारासाठी शहरात धाव घेणाऱ्या मजूर वर्गाचे ठेकेदार मंडळींकडून होणारे शोषण, सुशिक्षित बेरोजगारांची नोकरीसाठीची  वणवण आदी विषयांवरही सदर कादंबरी भाष्य करते. 


 आदिवासींची शेतीपद्धती, शेतीविषयक वर्षभर करावयाची विविध कामे, आदिवासी जीवनशैली, सण, उत्सव साजरा करण्याच्या पद्धती, डोंगर मावल्या ,  हिरवा देव , रीती रिवाज, निसर्गजाणीवा अशा अंगानेही सदर कादंबरीत प्रसंग निर्माण केले आहेत. अशा या 'पाड्यावरच्या टिल्ल्या' या कादंबरीची निवड उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे पदव्युत्तर अभ्यासक्रममासाठी निवड झाल्याने पेठ, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, दिंडोरी, कळवण भागातल्या आदिवासी समुदायातील जनतेकडून लेखक तुकाराम चौधरी यांचे कौतुक होत आहे. तसेच साहित्यिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.