Ticker

6/recent/ticker-posts

कोयना धरणात ८४.९९ टीएमसी पाणीसाठा.



 धरणाचे सहा वक्री दरवाजे सात फुटांवर स्थिर.  कोयना नदीपत्रात प्रतिसेकंद ३२,१०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग. धरणात ८४.९९ टीएमसी पाणीसाठा.


पाटण ( दिनकर वाईकर  ) 

कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्यात पावसाचा जोर पूर्णपणे मंदावला आहे. धरणातील पाण्याची आवक व जावक सध्या समांतर ठेवण्यात आली आहे. भविष्यातील पाऊस व धरणाची संपुष्टात येत असलेली पाणी साठवण क्षमता लक्षात घेता अद्यापही धरणाचे सहा वक्र दरवाजे सात फुटांवर स्थिर ठेवण्यात आले आहेत. धरणात प्रतिसेकंद ३६,६४६ क्युसेक्स पाण्याची आवक होत असून पूर्वेकडे कोयना नदीपात्रात ३२,१०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

     धरणांतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर सर्वच परिसरात पावसाचा जोर कमी झाला आहे. छोट्या नद्या, नाले, ओढ्यांमधून प्रतिसेकंद सरासरी ३६,६४६ क्युसेक्स पाण्याची आवक होत असल्याने धरण पाणीसाठ्यात संथगतीने वाढ होत आहे. धरणाचे दरवाजे सात फूटांवर स्थिर ठेवण्यात आले असून यातून ३० हजार तर पायथा वीजगृहातील २० मेगॅवॅट क्षमतेच्या दोन्ही जनित्रांद्वारे ४० मेगॅवॅट वीजनिर्मिती करून २,१०० असे प्रतिसेकंद ३२,१०० क्युसेक्स  पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

      धरणाच्या एकूण १०५.२५ टीएमसी पाणीसाठ्यापैकी आता ८४.९९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी यापुढे २०.२६ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे.

    धरणात सध्या ८४.९९ टीएमसी उपलब्ध तर ७९.८७ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा असून मागील चोवीस तासात धरण पाणीसाठ्यात ०.६७  टीएमसीने तर पाणी उंचीत ९ इंच वाढ झाली आहे. रविवार संध्याकाळी पाच ते सोमवार संध्याकाळी पाच या चोवीस तासात कोयना ७३ मिलिमीटर, नवजा ४९ मिलिमीटर, तर महाबळेश्वर १०३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान अद्यापही कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ असल्याने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा कायम आहे.