बुध दि .[ प्रकाश राजेघाटगे ]
मेंदूशास्त्राचा सखोल अभ्यास करून ज्ञानरचनावादी अध्यापन पद्धती अत्यंत प्रभावीपणे आणि परिणामकारक रित्या राबवून गटशिक्षणाधिकारी प्रतिभा भराडे यांनी प्राथमिक शिक्षणात गुणवत्ता वाढीसाठी केलेले अभिनव कार्य संपूर्ण महाराष्ट्र राज्याला दिशा देणारे ठरले आहे.सध्या खटाव तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी पदी कार्यरत असणाऱ्या प्रतिभा भराडे या सातारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला एक उपक्रमशील, प्रयोगशील आणि परिवर्तनशील अधिकारी म्हणून परिचित आहेत.
श्रीमती भराडे यांनी सातारा जिल्ह्यातील कुमठे बीटामध्ये राबवलेली ज्ञानरचनावादी अध्यापन पद्धती व त्यातून झालेले आमुलाग्र गुणवत्तापूर्ण बदल राज्यस्तरापर्यंत पोहोचले. राज्यातील विविध जिल्ह्यांमधून लाखो शिक्षकांनी व शिक्षण तज्ञांनी कुमठे बीटातील शाळांना भेटी दिल्या. अनेक अभ्यास दौऱ्यांच्या माध्यमातून हा 'प्रतिभा पॅटर्न' राज्यातील प्रत्येक शाळाशाळांपर्यंत पोहोचला.
श्रीमती भराडे यांच्या याच वैशिष्ट्यपूर्ण कार्याची दखल घेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाने शैक्षणिक साहित्य पेट्यांची निर्मिती केली. शिक्षणाची वारी यासारख्या महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमामध्ये प्रतिभा भराडे यांनी राज्यभर प्रमुख मार्गदर्शकाची भूमिका बजावली. महाराष्ट्राबाहेर देखील विविध राज्यांमध्ये रचनावादी अध्यापन पद्धतीवर त्यांनी असंख्य व्याख्याने दिलेली आहेत.
सन 2019 पासून श्रीमती भराडे या त्यांची जन्मभूमी असलेल्या खटाव तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदाची धुरा अत्यंत कल्पकतेने सांभाळत आहेत.ज्ञानरचनावादी अध्यापन पद्धती विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी कशी सर्वोत्तम ठरू शकते हे त्यांनी प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवले आहे.प्रत्येक मूल शिकू शकते, त्यासाठी शाळेत तसे पोषक शैक्षणिक वातावरण तयार व्हायला हवे. म्हणून खटाव तालुक्याच्या सर्व शाळांचा चेहरा - मोहरा बदलण्याचे कार्य त्यांच्या काळात झाले.
तालुक्यातील 100% शाळांमध्ये शैक्षणिक साहित्यांच्या पेट्यांचा वापर, सर्व शाळांचे अंतरंग प्रकाशित करण्यासाठी सुयोग्य रंगसंगती, नैसर्गिक प्रकाश योजनेसाठी पारदर्शक पत्र्यांचा वापर, संगीतमय परिपाठ, विद्यार्थ्यांच्या स्वयं अध्ययनास संगीतसाथ अशा कल्पक उपक्रमांना त्यांनी मूर्त रूप दिले. बालवयातच मुलांची कल्पनाशक्ती वाढावी यासाठी मुलांनी स्वभाषेत स्वतः गोष्टी तयार करणे, सोप्या - सोप्या इंग्रजी वाक्यांवरून छोट्या कथा बनवणे, इंग्रजीच्या विकासासाठी नियमित माईंड मॅप बनवणे, इंग्रजी व मराठी छोट्या छोट्या कविता तयार करणे आणि विद्यार्थ्यांनी बनवलेल्या सर्व गोष्टी प्रदर्शन फलकावरती लावणे असे वैविध्यपूर्ण उपक्रम राबवून बालमनामध्ये मोठे चैतन्य निर्माण करण्यात त्या यशस्वी ठरल्या आहेत.
मुलांच्या एकाग्रतेसाठी बुद्धिबळ, कॅरम, जिभल्यांसारखे खेळ, विषय रांगोळी, नियमित गोष्टींच्या पुस्तकांचे वाचन अशा छोट्या छोट्या उपक्रमातून मुलांचा आत्मविश्वास आणि गुणवत्ता वाढवण्याचे कार्य त्यांनी लिलया साध्य केले आहे. बोलक्या भिंतींपेक्षा विद्यार्थ्यांना नियमित कृती करता येतील असे फरशीवरील आरेखन करून वर्षानुवर्ष अबोल असणारे शाळेचे व्हरांडे आणि वर्ग खोल्यातील फरशा त्यांनी बोलत्या केल्या आहेत.
कृतीयुक्त अध्यापन हा रचनावादाचा आत्मा आहे. हे जाणून श्रीमती भराडे यांनी खटाव तालुक्यातील 100% शाळांमधून वर्गआरेखन करून घेतले. या आरेखनामुळे एका - एका आकृतीवर असंख्य गणिती क्रिया, मराठी - इंग्रजी वाक्य लेखन, शब्द संपत्तीचा सराव होऊ लागला. मुले तासनतास या आरेखनावर आनंदाने शैक्षणिक काम करू लागली आहेत.
आजवर त्यांनी केलेले कल्पक आणि परिवर्तनवादी कार्य हे एक दीपस्तंभ बनून शिक्षकांना सदैव दिशादर्शक ठरणार आहेत. मुलांना घडवणाऱ्या शिक्षकांना घडवण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य सत्कर्मी लावणाऱ्या सातारा जिल्ह्याच्या या सुकन्येस त्रिवार वंदन.
निवृत्ती ही नोकरीची आहे सेवेची नाही.
गेली 38 वर्ष प्राथमिक शिक्षण विभागाच्या बळकटीसाठी व गुणवत्तापूर्ण पिढी तयार होण्यासाठी श्रीमती प्रतिभा भराडे या अव्याहतपणे झटत राहिल्या आहेत. प्रयोगशील आणि परिवर्तनवादी कार्यातून गुणवत्तेचा नवा कीर्तिमान रचणाऱ्या श्रीमती भराडे या येत्या 31 जुलै 2024 रोजी आपल्या नोकरीतून निवृत्त होत आहेत. असे असले तरी शिक्षणाची सेवा म्हणून मार्गदर्शनपर व्याख्याने, कृती तासिका, कार्यशाळा अशा विविध विधायक मार्गांनी कार्यरत राहण्याचा त्यांचा मानस आहे.





Social Plugin