Ticker

6/recent/ticker-posts

अंबडमध्ये महसूल पंधरवाड्याच्या दुसऱ्या दिवशी विविध उपक्रम


अंबड / प्रतिनिधी आकाश जळके

जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभाग एक ऑगस्ट पासून जिल्ह्यात महसूल पंधरवाडा राबवत  आहे . अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांनी कळविल्यानुसार  या महसूल पंधरवाड्यात  ,  प्रत्येक दिवशी समाजाच्या विविध घटकातील नागरिकांसाठी  विशेष मोहिम / कार्यक्रम  /  उपक्रम  / शिबीरे / महसूल अदालत यांचे आयोजन करण्यात येणार आहे . 

    महसूल सप्ताहामध्ये जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी कळविले आहे . त्यानुसार 2 ऑगस्ट रोजी अंबडला तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आधार कार्ड केंद्र येथे भेट देऊन सृष्टी व देविता संतु जायभाये ,  रामकुंवर कांबळे व इतर महिलांना आधारकार्ड चे वाटप केले .  उपस्थित नागरिकांशी चर्चा केली .यावेळी सोबत नायब तहसीलदार विश्वास धर्माधिकारी , कचरू काथार व मिलिंद शिनगारे होते .

     यानंतर उपविभागीय अधिकारी दीपक पाटील व तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी अंबडच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस भेट दिली . तेथे उपस्थित विद्यार्थ्यांना युवा कार्य प्रशिक्षण योजनेबद्दल उपविभागीय अधिकारी यांनी माहिती दिली . तसेच नमूद केले की सर्व विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला पाहिजे , सामान्य ज्ञान ठेवले पाहिजे . तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी या योजनेविषयी माहिती देताना म्हटले की 

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना  लाडका भाऊ योजना म्हणून ओळखली जाते . महाराष्ट्र शासन बेरोजगार तरुणांसाठी ही योजना राबवत आहे . तरुणांची रोजगारक्षमता आणि कौशल्य संच वाढवणे आणि त्यांना स्पर्धात्मक नोकरीच्या बाजारपेठेसाठी तयार करणे हे उद्दिष्ट आहे . पात्र उमेदवार हे 18 ते 35 वयोगटातील आणि महाराष्ट्रातील रहिवासी असावेत. 

      दरवर्षी 10 लाख तरुणांना राज्य सरकारकडून दरमहा 10 हजार रुपये स्टायपेंडसह प्रशिक्षण दिले जाईल .  सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार , दरवर्षी 11 लाखांहून अधिक विद्यार्थी महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांमधून पदवी , पदव्युत्तर आणि पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण होतात . उत्तीर्ण झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांना चांगल्या नोकऱ्या मिळतात तर काही विद्यार्थी बेरोजगार राहतात .

     महाराष्ट्र शासनाचा कौशल्य , रोजगार , उद्योजकता आणि नवोपक्रम विभाग हा या योजनेचा नोडल विभाग आहे . 12 वी उत्तीर्ण तरुणांना दरमहा रु. 6,000 , ITI किंवा डिप्लोमा उत्तीर्ण युवकांसाठी प्रति महिना रु 8,000 , पदवीधर तरुणांना दरमहा रु 10,000 मिळणार आहेत . 

     या योजनेच्या प्रशिक्षणासाठी केवळ 18 वर्षांवरील आणि 35 वर्षांपेक्षा कमी वयाचे तरुण अर्ज करू शकतात .  मासिक भत्ता तसेच प्रशिक्षण मिळविण्यासाठी लाभार्थी युवक महास्वयम् पोर्टलवर  ऑनलाइन अर्ज करू शकतात . योजनेची प्राथमिक उद्दिष्टे कौशल्य विकास ,  रोजगार निर्मिती , युवा सक्षमीकरण , आर्थिक वाढ करणे इ आहेत . 


लाभार्थी तरुणांना खालील कागदपत्रांची आवश्यकता असेल 

महाराष्ट्रातील वास्तव्याचा पुरावा , आधार कार्ड , मोबाईल नंबर , शिक्षणाशी संबंधित कागदपत्रे ,उत्पन्न प्रमाणपत्र , पासपोर्ट आकाराचा फोटो 

संपर्कासाठी  पत्ता 

महाराष्ट्र महास्वयम् हेल्पलाइन क्रमांक :- 18001208041 महाराष्ट्र कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विभाग हेल्पलाइन क्रमांक 022-22625651, 022-22625653 महाराष्ट्र कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विभाग हेल्पडेस्क ईमेल: helpdesk@sded.in. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विभाग, महाराष्ट्र शासन, मॅडम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई – 400032 हा आहे.


      या पंधरवाड्यात नागरिकांना अधिकाधिक सोयीसुविधा देण्यात येऊन नागरिकांची कामे सुकर करण्यासाठी तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तत्पर असतील असा विश्वास अंबडच्या नायब तहसीलदार धनश्री भालचीम यांनी दर्शविला आहे .