बुध दि .[प्रतिनिधी ]
पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टतर्फे प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही श्री हनुमानगिरी महाराज यांच्या ४४ व्या पुण्यतिथीनिमित्ताने श्री सेवागिरी व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. श्री सेवागिरी मंदिराच्या प्रांगणात २९ ऑगस्ट ते चार सप्टेंबरदरम्यान रोज सायंकाळी साडेपाचला ही व्याख्यानमाला होईल, अशी माहिती देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज व ट्रस्टचे चेअरमन रणधीर जाधव यांनी दिली. व्याख्यानमालेचे यंदाचे २४ वे वर्ष आहे. गुरुवारी (ता. २९) निवृत्त सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख यांचे 'माणूस म्हणून जगण्यासाठी' या विषयावर, शुक्रवारी (ता. ३०) मुंबई येथील प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांचे 'छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनतंत्र' या श्री सेवागिरी महाराज विषयावर, शनिवारी (ता. ३१) अहिल्यानगर येथील डॉ. संजय कळमकर यांचे 'हसायदान (हास्य व विनोदी कथा)' या विषयावर, रविवारी (ता. एक) छत्रपती संभाजीनगर येथील कापूस, सोयाबीन, तेलबिया कृषी विभाग महाराष्ट्र राज्याचे मुख्य सल्लागार उदय देवळाणकर यांचे 'जागतिकीकरणात
भारतीय शेतीचे भविष्य' या विषयावर, सोमवारी (ता. दोन) विठ्ठल-रुक्मिणी मंदिर पंढरपूर समितीचे विश्वस्त शिवाजी महाराज मोरे यांचे 'संत परंपरेतून पर्यावरण रक्षण' या विषयावर, मंगळवारी (ता. तीन) मुंबई येथील ज्येष्ठ आयटी तज्ज्ञ, समाज माध्यम सल्लागार उदय निरगुडकर यांचे 'भारत काल, आज आणि उद्या' या विषयावर व्याख्यान होईल. बुधवारी (ता. चार) पुणे येथील सुनील देवधर हे 'अखंड राष्ट्रीयत्व' या विषयावर व्याख्यान देतील.
पाच सप्टेंबरला श्री हनुमानगिरी महाराज यांच्या ४४ व्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी ११ वाजता समाधीस महाभिषेक, मंत्रपुष्पांजली, आरती व नंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे. दरम्यान, व्याख्यानमालेच्या यशस्वितेसाठी ट्रस्टचे रणधीर जाधव, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, बाळासाहेब ऊर्फ संतोष जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव, सचिव विशाल माने विशेष परिश्रम घेत आहेत. चौकट -पुसेगाव व पंचक्रोशीतील रसिक साहित्यप्रेमी श्रोत्यांना अपूर्व पर्वणी असलेल्या वाङ्मयाचे संयोजन गुरुवारपासून (ता. २९) ते बुधवारपर्यंत
(ता. चार) केले आहे. रसिकांनी या संधीचा लाभ घ्यावा. - रणधीर जाधव, चेअरमन, श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट





Social Plugin