पाटण येथे भर पावसात हजारोंच्या संख्येने मुक निषेध मोर्चा .
पाटण दि. २४ ( दिनकर वाईकर )
बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारासह राज्यात महिला तरुणी व अल्पवयीन मुलींवर वाढलेले अत्याचार व अन्याय या विरोधात शासनाने तातडीने कठोर भूमिका घेत संबंधितांना फाशी व कठोर कारवाया कराव्यात. राज्यातील महिलांवरील अत्याचाराचे हे लोन पाटण तालुक्यातील तारळेपर्यंत पोहोचले आहे. गुन्हेगार प्रवृत्तींच्या कार्यकर्त्यांना प्रशासनावर दबाव टाकून मोकाट सोडले जाते अशा घटनांचा आम्ही तीव्र निषेध करत संबंधित राज्यकर्त्यांनी नैतिकतेची चाड बाळगत राजीनामे द्यावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी केली.
बदलापूर घटनेचा निषेध व महिला, तरुणी, अल्पवयीन मुलींवर राज्यात व तालुक्यात वाढलेले अत्याचार याच्या निषेधासाठी पाटण येथे सत्यजितसिंह पाटणकर यांचे नेतृत्वाखाली हजारोंच्या संख्येने महिला, विद्यार्थी,विद्यार्थिनी, नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भर पावसात निषेध मोर्चा काढला होता त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना सत्यजितसिंह पाटणकर पुढे म्हणाले बदलापूर येथे अल्पवयीन मुलींवर स्थानिक शाळेच्या कर्मचाऱ्याने अतिशय घृणास्पद अत्याचार केला. यासह मागील काही वर्षात राज्यात महिलांवर वाढलेले अत्याचार, अन्याय यासह तरुणी, अल्पवयीन मुलींवर होत असलेले क्रूर अत्याचार या विरोधात समाजामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. अशा नराधमांना फाशीची शिक्षा तर झालीच पाहिजे याशिवाय संबधितांवर कठोरात कठोर कडक कारवायाही झाल्या पाहिजेत. दुर्दैवाने ज्यांच्या हाती राज्याची सत्ता आहे असे राज्यकर्ते या अपप्रवृत्तींच्या विरोधात आवाज उठवण्याऐवजी ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांचाच आवाज बंद करण्याचा प्रयत्न करत आहेत. मध्यंतरी पाटण तालुक्यातील तारळे येथेही एका महिलेवर स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांनी अन्याय, अत्याचार केला. संबंधित महिलेने पोलिसांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला मात्र तेथेही राजकीय दबाव टाकून कार्यकर्ते गुन्हेगारांना सोयीस्कररित्या यातून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे देशात, राज्यातच नव्हे तर आता हेच विकृतीचे लोण थेट पाटण विधानसभा मतदारसंघातील महिला, तरुणींपर्यंत पोहोचले आहे. राजकीय सत्तेचा वापर आपल्याच माय माऊलींच्या विरोधात करणाऱ्या अशा अपप्रवृत्तींविरोधात आता सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन लढण्याचा निश्चय केला आहे. यापुढे आपल्या आई बहिणींकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करणार नाही यासाठीच आम्ही हा लढा पुकारला आहे. एका बाजूला यातील दोषी नराधमांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजेच, याशिवाय या दुर्दैवी घटनांना जबाबदार व गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या विद्यमान राज्यकर्ते मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांनी नैतिकतेची चाड बाळगून आपला राजीनामा द्यावा. महिला भगिनी, तरुणी, अल्पवयीन मुलींवर कोणी अन्याय, अत्याचार केला तर तितक्याच ताकतीने आम्ही या विरोधात लढा पुकारून पिडीतांना न्याय मिळवून देऊ असा विश्वासही शेवटी सत्यजितसिंह पाटणकर यांनी व्यक्त केला.
यावेळी शिवसेना उ.बा. ठा. पक्षाचे तालुकाप्रमुख सुरेश पाटील, मनसेचे तालुका प्रमुख गोरख नारकर, सुभाषराव पवार,संजय इंगवले, सौ. विद्या म्हासुर्णेकर, सौ. मीनाज मोकाशी, सौ. सोनल फुटाणे, सौ. गायकवाड, सौ. डावखरे, सौ. हादवे आदी मान्यवर पदाधिकारी, महिला, विद्यार्थिनी आदींनी निषेधात्मक विचार व्यक्त केले.
आभार प्रदर्शन चंद्रकांत मोरे यांनी केले.






Social Plugin