राजाभाऊ शेलार यांचा प्रशासनाला गर्भित इशारा.
पाटण ( दिनकर वाईकर
पाटण ते कोयना या महामार्गाची पूर्णपणे दयनीय अवस्था झाली आहे. ४ ऑगस्टला महाविकास आघाडीच्या वतीने याच रस्त्यावर आंदोलन करून प्रशासनाला एक महिन्याची मुदत दिली होती. मात्र केवळ कोणाच्यातरी दौऱ्यासाठी खड्डे भरण्याचा फार्स करणाऱ्या याच प्रशासनाने ४ सप्टेंबरपूर्वी हे खड्डे पूर्णपणे दर्जेदार व्यवस्थित भरले नाहीत तर 5 सप्टेंबरला याच रस्त्यावर कोणत्याही परिस्थितीत जेसीबी लावून हे रस्ते उखडून टाकू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पाटण विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी एका पत्रकाद्वारे प्रसिद्धीला दिला आहे.
याबाबत राजाभाऊ शेलार यांनी पुढे म्हटले आहे की, पाटण कोयना रस्ता हा स्थानिक जनता अथवा प्रवाशांसाठी नसून तो केवळ मान्यवरांच्या मर्जीतल्या ठेकेदार व टक्केवारीसाठी निर्माण झालेल्या मलीदा गॅंगसाठीच तयार करण्यात आल्याचा आमचा आरोप आहे. या संदर्भात गणेशोत्सवापूर्वी या रस्त्यावरील खड्डे चांगल्या पद्धतीने भरून पावसाळा संपतात येथे चांगला दर्जेदार रस्ता व्हावा यासाठी चार ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही जन आंदोलन केले होते. त्यावेळी प्रशासनाने आम्हाला पंधरा दिवसात खड्डे भरण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र त्यानंतरही आम्ही त्यांना तब्बल एक महिन्याची मुदत दिली होती मात्र तरीदेखील अध्यापपर्यंत हे अपेक्षित काम झाले नाही. त्यामुळे कोणाच्यातरी दौऱ्यासाठी अथवा आगमनासाठी तात्पुरते खड्डे भरून स्थानिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न जर प्रशासन करत असेल तर ते आम्ही कदापिही खपवून घेणार नाही. त्यामुळे अजूनही वेळ आहे प्रशासनाने तातडीने चांगल्या प्रतीने चार सप्टेंबरपूर्वी हे खड्डे भरावेत अन्यथा पाच सप्टेंबर रोजी आम्ही याच रस्त्यावर जेसीबी लावून ज्या ज्या ठिकाणी भले मोठे खड्डे पडले आहेत तेथे उखरून त्या ठिकाणचा रस्ता पूर्वीप्रमाणे तयार करू आणि याला पूर्णपणे संबंधित शासन, प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही या पत्रकाद्वारे राजाभाऊ शेलार यांनी दिला आहे.
या पत्रकावर माजी पंचायत समिती सदस्य बबनराव कांबळे, माजी सरपंच बाळासाहेब कदम, सत्यजित शेलार, बापू देवळेकर, डॉ. कदम, शिवसेना उबाठा गटाचे रवींद्र पाटील, युवराज मोहिते, अनुप मोहिते आदी मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.




Social Plugin