Ticker

6/recent/ticker-posts

शिवछत्रपती पुतळा कोसळल्या निषेधार्थ पाटण येथे जोडे मारो आंदोलन.



मलिदा गॅंग' कमिशनमुळेच शिवरायांचा पुतळा कोसळला --- सत्यजितसिंह पाटणकर.

* येत्या दहा दिवसातच दोषींवर कारवाई झालीच पाहिजे.

पाटण येथे महाविकास आघाडीकडून जोडे मारो आंदोलन.


पाटण ( दिनकर वाईकर ) 

मालवण येथील राजकोट किल्ल्यावर आपल्या सर्वांची अस्मिता असणारे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. हा शिवरायांचा पुतळा नव्हे तर महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला असून याला जबाबदार  दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी. आजपर्यंत सार्वजनिक व शासकीय, प्रशासकीय कामात टक्केवारी खाणाऱ्या आजच्या राज्यकर्त्यांनी भ्रष्टाचारी मानसिकतेतून छत्रपतींचा पुतळाही सोडलेला नाही. हे भ्रष्टाचारी शासन, राज्यकर्त्यांना उलथवून टाकण्याशिवाय आता पर्यायच नाही. राज्यासह पाटण विधानसभा मतदारसंघातही असलेली टक्केवारी, कमीशनची मलिदा गॅंग आता उध्वस्त करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी केले.

     पाटण येथे मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीसह अन्य पक्ष, संघटनांच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

    यावेळी बोलताना सत्यजितसिंह पाटणकर पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे आपली अस्मिता, आराध्य दैवत, विचार, संस्कार आणि आदर्शांचे प्रतीक आहेत. मालवण येथील छत्रपतींचा पूर्णाकृती पुतळा कोसळण्याचे दुर्भाग्य आपल्या महाराष्ट्रात घडते यासारखी निंदनीय बाब नाही. काँग्रेसने काय केले असे विचारणाऱ्या सत्ताधारी राजकारण्यांनी काँग्रेसच्या काळात उभारलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यातच नव्हे तर देशभरातील पुतळे आजही अतिशय चांगल्या अवस्थेत पाहायला मिळताहेत हे एकदा जाऊन तपासून पहावे. दुर्दैवाने आपले राज्यकर्ते दस्तूरखुद्द मुख्यमंत्रीच शिवरायांचा पुतळा वाऱ्याने पडल्याचे घृणास्पद वक्तव्य करतात. ज्या वाऱ्याने त्या विभागातील नारळाच्या झाडावरील नारळ पडला नाही मात्र तिथे छत्रपतींचा पुतळा वाऱ्यामुळे पडला असे विधान करून मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची प्रतिमा व अस्मिता धुळीला मिळवली आहे.

     आजच्या राज्यकर्त्यांनी रस्ते, पाणी, वीज, प्राथमिक शाळा, आरोग्य केंद्र, समाज मंदिरे आदी सर्वच ठिकाणी कमिशन, टक्केवारीतून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला आहेच. एवढ्यावरच न थांबता यांनी थेट  छत्रपतींच्या पुतळ्यालाही टक्केवारीचा हात घातल्याने अवघ्या आठ महिन्यातच हा पुतळा कोसळला यासारखी लांछनास्पद बाब नाही. एका बाजूला राज्यात अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात कमिशन, भ्रष्टाचार, टक्केवारी बोकाळली असताना त्याच पद्धतीची मलिदा गॅंग पाटण विधानसभा मतदारसंघातही सक्रिय आहे. मागील काही वर्षात याच मलीदा गॅंगकडून सार्वजनिक व्यवस्था उध्वस्त झाली असून यातून सार्वजनिक विकास कामांचे वाट्टोळे झाले आहे. आपल्याच घामाच्या कराच्या पैशाच्या माध्यमातून  ही मलिदा गॅंग टक्केवारी, कमिशनमधून आपल्यालाच उध्वस्त करत असल्याने येणाऱ्या निवडणुकीत यांना हद्दपार करणे ही आता प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. ही टक्केवारी, कमीशन नक्की कुणाच्या घशात व कोणाच्या खिशात जाते हे वेगळं सांगण्याची गरज नाही.  इतरवेळी किरकोळ बाबीतही समोर येऊन बोलणारे नेते छत्रपतींचा पुतळा कोसळल्यानंतर मूग गिळून गप्प का? यावरूनच यांच्या  भ्रष्टाचार मानसिकतेची प्रचिती येते. याशिवाय मालवण पुतळा दुर्घटनेची चौकशी येत्या दहा दिवसातच होऊन संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी नाहीतर वेळकाढूपणा करणारे राज्यकर्ते स्वतःच अशा घटनांना जबाबदार असल्याने याबाबत कोणत्याही कारावया करणार नाही अशीही भीती सर्वसामान्य जनतेला वाटते. मात्र यांनी आता काहीही करू द्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अशा भ्रष्टाचारी राज्यकर्त्यांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असेही शेवटी सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले.

     यावेळी राज्यकर्त्यांच्या निषेधार्थ बनवलेल्या प्रतिकात्मक पुतळ्याला मान्यवर नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोडे मारत भ्रष्टाचारी राज्यकर्त्यांचा जाहीर निषेध केला. शिवछत्रपतींचा पुतळा कोसळल्या प्रकरणी संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी व या घटनेचा तीव्र निषेध केल्याचे निवेदन सत्यजितसिंह पाटणकर व उपस्थित मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रशासनाला देण्यात आले.

       यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पाटण विधानसभा मतदार संघ अध्यक्ष राजाभाऊ शेलार , सरचिटणीस सुभाषराव पवार, संजय इंगवले, दयानंद शिलवंत, शंकर शेडगे, मनोहर यादव, बकाजीराव निकम, श्रीमती पुष्पाताई जाधव, सचिन जाधव, विश्वजीत पाटणकर, विशाल निकम, बबनराव कांबळे आदी अनेक मान्यवरांनी निषेधार्थ विचार व्यक्त केले.

     यावेळी पाटण अर्बन बँक चेअरमन बाळासाहेब राजे महाडिक, खरेदी विक्री संघ चेअरमन अॅड. अविनाश जानुगडे, युवा उद्योजक अर्जुनसिंह पाटणकर, मनसेचे तालुकाध्यक्ष गोरख नारकर, दिनकरराव घाडगे, अभिजीत जाधव, माजी पंचायत समिती सभापती सौ. सुनंदा गुरव, गुरुदेव शेडगे महाविकास आघाडीसह अन्य पक्ष संघटना, संभाजी ब्रिगेड आदींचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, महिला विद्यार्थी, विद्यार्थिनी व तरुण-तरुणी बहुसंख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन शंकर शेडगे यांनी केले.


- कमिशन टक्केवारीसाठी शिवरायांच्या पुतळ्याचे घाट घालू नका.

  कमिशन, टक्केवारीच्या अपप्रवृत्तीमुळेच मालवण येथे शिवछत्रपतींचा पुतळा कोसळला. पाटण तालुक्यातही शिवरायांचा पुतळा उभा करण्याचा प्रयत्न होत आहे,  शिवरायांचा पुतळा उभारणीसाठी आम्हा सर्वांचा निश्चितच पाठिंबा असेल. मात्र दुर्दैवाने यात कमिशन, टक्केवारी, निकृष्ट दर्जाचे काम अथवा गलथानपणा झाला तर मात्र संबंधितांना सोडणार नाही असा इशाराही मान्यवरांनी या निषेध मोर्चावेळी दिला.