गणेश उत्सव काळात सुरळीत वीजपुरवठा करण्यात महावितरण फेल
राजू गागरे
झरी तालुक्यात गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवसापासून पावसाने लावलेल्या हजेरीमुळे तालुक्यातील अनेक गावांतील वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत.गणेशोत्सवाच्या काळात वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे गणेशोत्सव मंडपातील काळोखाने गणेश भक्त कार्यकर्ते त्रस्त झाले आहेत. मुकूटबन, पिंप्रडवाडी, राजूर, बैलंपूर, मांगली, हिरापूर, गाडेघाट, मार्की, आशा ईतरही अनेक गावांतील वीजपुरवठा सुरळीत नसल्याचे चित्र आहे.
महावितरणच्या कार्यालयात दूरध्वनी केला तरी सततच्या व्यस्त असल्याच्या सूचनेने तर कार्यकर्ते वैतागले आहेत. त्यामुळे महावितरण विरोधात नाराजीचा सूर व्यक्त होऊ लागला आहे. गणपतीच्या आरत्या, सजावटीमधील विद्युत रोषणाई आणि देखावे या बत्तीगुल कारभारामुळे वारंवार बंद पडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ही परिस्थिती निर्माण झाली असताना महावितरणच्या वतीने तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात असमर्थ ठरत आहे.
गणेशोत्सवाच्या काळात विजेची सर्वाधिक आवश्यकता असताना महावितरणकडून मात्र समाधानकारक सेवा मिळत नसल्याचे गणेशोत्सव मंडळांचे म्हणणे आहे. गणेश मंडपात वीज जोडण्या केल्यापासून केवळ काही तासच वीजपुरवठा झाला असून जास्तीत जास्त वेळ वीज बंद असल्याचे चित्र या तालुक्यातील अनेक गावांत दिसून येत आहेत. वीज नसल्याने गणेश मंडळाच्या मांडपामध्ये उसळणारी गर्दी घटली असून नव नवीन धार्मिक उपक्रम चलचित्र रंगीबेरंगी लायटिंग देखावे बंद करून ठेवण्याची नामुष्की मंडळांवर येऊन ठेपली आहे. महावितरणच्या कार्यालयामध्ये विजेच्या तक्रारीसाठी फोन केला असता त्यांना महावितरणच्या व्यस्त सेवेचा फटका सहन करावा लागतात. एकीकडे महाराष्ट्र शासनाच्या वतीने गणेश उत्सवात भावीकांना योग्य ठराविक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे असे सांगितले जात आहे. येथे मात्र वारंवार वीज खंडित होत आहे.
गणेश उत्सवात कोणत्याही प्रकारचे भारनियमन नसल्याचे महावितरणच्या वतीने सांगण्यात येत असले तरी भारनियमनापेक्षाही जास्त तास या भागातील वीज गुल होऊ लागली आहे. गणेश उत्सवात अनेक भागात बत्तीगुल वीजेचा मोठा फटका सहन करावा लागत असल्याने महावितरण विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे महावितरण कडून वारंवार वीज खंडित होण्याचे कारण शोधून तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी. व वीजपुरवठा सेवा सुरळीत करण्यात यावे अशा मागणीच्या चर्चा होत आहे.
.jpeg)




Social Plugin