Ticker

6/recent/ticker-posts

वडीगोद्री येथील भुखंड लिलाव प्रक्रियेला शेतकऱ्यांचा विरोध



बंडु शिंगटे  घुंगर्डे हादगाव 

   अंबड तालुक्यातील वडिगोद्री येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भुखंड लिलाव प्रक्रियेला शेतकऱ्यांनी विरोध करून  महिलेसह तीन  शेतकऱ्यांनी अंगावर पेट्रोल घेत आत्महदहनाचा प्रयत्न केल्यानं हा लिलाव बंद पाडला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वडीगोद्री येथील मार्केट यार्ड सुमारे ६१ एकरचे आहे. या ६१ एकरवर संचालक मंडळ व सभापती यांनी भूखंड विक्री करण्याचा निर्णय घेतला होता.आज या विक्री प्रक्रियेचा लिलाव मार्केट यार्डात होता. यावेळी या मार्केट कमिटीला जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांनी आमच्या रोजगाराचं पहिले बघा नंतर लिलाव करा. आम्ही भूमिहीन झालोत. बाजारपेठसाठी जमीन देऊन आम्ही चूक केली का? आम्हाला विकसित भूखंड देऊन आम्हाला रोजगाराला संधी द्या अशी मागणी संचालक मंडळाकडे केली होती.

   मात्र संचालक मंडळाने या मागणीकडे काना डोळा केला त्यामुळे संतप्त शेतकर्यांनी बाजार समितीच्या प्रवेशद्वारा जवळ उपोषण उपोषणाचा पवित्र घेतला. लिलाव प्रक्रिया सुरू झाल्याने या संतप्त शेतकऱ्यांनी लिलावाच्या ठिकाणी जात घोषणाबाजी केली. यावेळी एक महिला व दोन तरुणांनी अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला.

   यावेळी पोलिसांनी संचालक मंडळ व सभापती यांना याबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधावा व त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन पुढील प्रक्रिया करावी अशी भूमिका घेतल्याने संचालक मंडळाने अखेर लिलाव रद्द केल्याची घोषणा करत या ठिकाणाहून पळ काढला.

   बाजार समितीच्या भूखंडाचा लिलाव होवू नये, बाधित  शेतकऱ्यांनी भुमिपुञाला न्याय मिळावा म्हणून  जिल्हाधिकारी तसेच उपनिबंधक जालना यांना तक्रारी करुनही बाजार समितीच्या वतीने मनमानी  प्रक्रिया सुरू करण्यात आली. तक्रारीची दखल न घेतल्याने महिलासह शेतकऱ्यांनी सकाळ पासून उपोषण सुरू केले होते.बाजार समितीसाठी जमीन संपादित झालेल्या स्थानिक शेतकऱ्यांना भूखंड राखीव ठेवावा अशी मागणी शेतकऱ्यांची होती. मात्र या  मागणी कडे दुर्लक्ष करत बाजार समिती सदस्य मध्ये लिलाव सुरू होता.

   या भागातील शेतकऱ्यांच्या कच्या मालाला बाजार पेठ मिळावी, व्यापार, उद्योग वाढावा. यासाठी या समितीची स्थापना करण्यात आलेली होती.मात्र बाजार समिती ही कागदावरच आहे. व येथील जमीन सर्व पडीक आहे.

आज भुखंड लिलाव प्रक्रिया सुरु होती मात्र या बाजार समितीत काही शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. त्यांना त्यावेळी तुटपुंजा मोबदला मिळाला असल्याने या शेतकऱ्यांनी कुटुंबासह लिलाव प्रक्रियेला विरोध करत  लिलाव ठिकाणी जात जोरदार घोषणाबाजी केली.

तर महिलेसह  शेतकऱ्यांनी अंगावर पेट्रोल टाकत आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांच्या सतर्कतेमुळं अनर्थ टळला.

    गोंदी पोलिसांनी आंदोलक आणि बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या समझोता करण्यासाठी प्रयत्न केला.  पदधिकाऱ्यांनी विरोध करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांशी कुठलीच चर्चा किंवा त्यांचं म्हणणं ऐकून घेतले नाही. याठिकाणी आत्मदहनाचा प्रयत्न झाल्याने अखेर शेवटी लिलाव प्रक्रिया गुंडाळून लिलाव रद्द करण्याचा निर्णय बाजार समिती पदाधिकारी घेत या ठिकाणाहून काढता पाय घेतला. लिलावासाठी आलेल्या व्यापाऱ्यांचाही हिरमोड बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे पहावयास मिळाला.

   यावेळी प्रभाकर काळे, ज्ञानेश्वर गावडे, रविंद्र खोमणे, शिवाजी काळे, अजिंक्य गावडे,कैलास खोमणे, भगवान काळे, दत्तात्रय काळे, रामनाथ काळे, ज्ञानेश्वर काळे, मंगलसिंग राजपूत या जमीन संपत्तीत झालेल्या शेतकऱ्यांसह त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. 

   यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष बळीराम खटके, पंचायत समिती माजी सभापती बापूराव खटके, उपसभापती रईस बागवान, यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची उपस्थिती होती.


१)

  वडीगोद्री येथे मुख्य बाजार समिती असुन  बिड राष्ट्रीय महामार्गालगत ६१ एकर जमीन आहे, सदर ही जमीन १९७२ साली पाटबंधारे विभाग महाराष्ट्र शासन यांनी अधिग्रहण केली होती. १९७२ ते २०१० पर्यंत या सर्व शेतकऱ्यांच्या नावे सातबारा उताऱ्यावर जमीन होती. मात्र अचानकपणे २०१० साली ही जमीन  कृषी उत्पन्न बाजार समिती वडीगोद्री च्या नावे वर्ग केली कशी? ... प्रभाकर बाप्पाजी काळे, शेतकरी

२)

बाजार समितीचे सभापती,उपसभापती व संचालकांनी मनमानी करुन भुखंड लिलाव करण्याचा आज घाट घातलेला होता. जमिनधारकांना तसेच स्थानिक शेतकरी ग्रामस्थांना विश्वासात न घेताच  भुखंडाची विक्री सुरू केली.शेतकऱ्यांनी ज्या हेतुसाठी जमीन दिली होती. तो हेतु साध्य होत नसल्याने हा लिलाव आम्ही बंद पाडला.... ज्ञानेश्वर किसन गावडे, शेतकरी.