अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
अंबड तालुक्यातील खेडगाव येथील शेतीनिष्ठ तथा प्रयोगशील शेतकरी सौ.सुचिता दत्तात्रय सिनगारे यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यपालांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर विभागातून दिल्या जाणाऱ्या जिजामाता कृषीभुषण पुरस्कार-2022 ने सन्मानित करण्यात आले आहे.
मुंबईत आयोजित या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल डॉ.सी.पी. राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री अजित पवार,कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते कृषी व कृषी संलग्न क्षेत्र फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी,संस्थांना 2020 ते 2022 या वर्षातील राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण झाले.यात सौ.सुचिता सिनगारे यांना जिजामाता कृषीभुषण पुरस्कार-2022 (छत्रपती संभाजीनगर विभाग) प्रदान करून सन्मान करण्यात आला.
सौ.सिनगारे यांनी पती दत्तात्रय सिनगारे व दिर पंढरीनाथ सिनगारे यांच्या सहकार्याने शेतीत विविध प्रयोग यशस्वीपणे राबविले आहेत.त्याची दखल घेत त्यांना यापूर्वीही विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.यात खरीप शेतकरी मेळावा सन- 2022,कृषि उद्योग मंथन पुरस्कार, कृषि प्रेरणा पुरस्कार- 2022,ऍग्रोवन युवा शेतकरी सन्मान-2024 यासह अन्य पुरस्कारांचा समावेश आहे.
या पुरस्काबद्दल सौ.सिनगारे यांचे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, कृषी अधिक्षक गहिनीनाथ कापसे,तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी,रावसाहेब ढगे, श्री. डुकरे,अंबड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष जिगे,कृषी सहायक डावखर, संतोष वैद्य,अशोक सव्वाशे आदींसह सर्व स्तरातून विशेष अभिनंदन होत आहे.
माझ्या पुरस्कारामध्ये सर्वांचा मोलाचा वाटा
शेतीक्षेत्र सध्या आव्हानात्मक स्थितीतून वाटचाल करत आाहे. वातावरण बदलासह अनेक संकटे शेतकऱ्यांची सत्वपरीक्षा घेत आहेत.अशाही स्थितीत नावीन्याचा ध्यास, प्रयोगशिलता, कष्टाच्या बळावर शेती क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख तयार करून सौ. सुचिता सिनगारे यांनी शेती विकासाचे ज्ञान केवळ आपल्यापुरते मर्यादित न ठेवता त्या परिसरातील शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी मार्गदर्शक झाल्या.शेती क्षेत्रातील त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांचा सदर पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.
राज्यपालांच्या हस्ते झालेला हा सन्मान माझ्या एकटीचा नसून यामध्ये अहोरात्र शेतात राबणाऱ्या महिला,मजूर,शेतकरी बंधू तसेच माझ्या खांद्याला खांदा देवून सुख दुःखात साथ देणारे पती दत्तात्रय सिनगारे, दिर पंढरीनाथ सिनगारे, जाऊ सुवर्णा सिनगारे तसेच सासर-माहेरचा सर्व परिवार या सर्वांचाच मोठा मोलाचा वाटा आहे अशी प्रतिक्रिया जिजामाता कृषीभुषण पुरस्कार प्राप्त शेतकरी सौ.सुचिता सिनगारे यांनी दिली.





Social Plugin