Ticker

6/recent/ticker-posts

परतीच्या पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबिन पिकाला फटका

 


बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ]

 बुध व पुसेगाव परिसरातील खरीप पिकातील सोयाबीन पीक काढणीला येताच पुन्हा परतीच्या पावसामुळे जोरदार हजेरी लावल्यामुळे सोयाबीन पीक बहुतांश ठिकाणी पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

        यंदा पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने सोयाबीन व खरिपातील पिके जोमदार आली आहेत . खरिपातील घेवड्याची पीक काढल्यानंतर शेतकऱ्यांनी सोयाबीन पीक काढणी योग्य होण्याची वाट पाहिली. सध्या शिवारामध्ये सोयाबीन काढणीला वेग आला आहे. परतीच्या पावसामुळे हाता तोंडाशी आलेली सोयाबीन चे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी धावपळ करत आहेत. त्यातच मजुरांच्या तुटवडा आणि त्यानी मजुरीचे भाव वाढवल्याने शेतकऱ्यांना अधिक भार सोसावा लागत आहे. उंच वाढलेले सोयाबीन काढण्यासाठी मजुरांशिवाय पर्याय नसल्याने शेतकरी मात्र हतबल होत आहेत. दिवसा ऊन आणि रात्री पडणारा मुसळधार पाऊस यामुळे बऱ्याच शेतात पाणी साठून राहिले असल्यामुळे सोयाबीनचे पीक पुन्हा पाण्याखाली गेले आहे. 

       बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून शेतात ठेवले आहे .ते गोळा करण्याआधीच पावसाच्या  तावडीत सापडले असल्यामुळे शेतकऱ्यांना आतोनात नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

       हा पाऊस रब्बी हंगामासाठी उपयुक्त ठरणार आहे. परंतु आता हता तोंडाशी आलेले खरीप पिके व सोयाबीन पाण्यात उभी आहेत. मागील तीन-चार दिवसापासून परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नदी, नाले, ओढे, वाहू लागले आहेत. सतत पडणाऱ्या पावसामुळे जमिनीतील ओलाव्यामुळे पीक काढताना अनेक अडचणी येत आहेत.या वेळी वेळेत पेरण्या झाल्यामुळे खरीप हंगामातील पिकांमधून  थोडीफार आर्थिक हातभार लागेल अशी आशा शेतकऱ्याला होती. त्यातच दसरा, दिवाळीला काहीतरी हाताला लागेल या आशेवर असणारा शेतकरी मात्र या पावसामुळे पूर्ण खचला आहे. मिळेल ते पदरात पाडून घेण्याची गडबड सध्या शेतकऱ्यांची सुरू असून शेतकरी आपल्या कुटुंबासह बरोबरीने काम करताना दिसत आहे .

 तीन दिवसापासून रात्रीच्या वेळी पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबिन पिकाला फटका बसला असून या पावसामुळे काढणीला आलेले सोयाबीन डोळ्यादेखत खराब होताना पहावे लागत आहे.पीक उभे असल्याने शेतात पाण्याचा निचरा होण्यासाठी वाट बघत असताना सातत्याने पाऊस पडत आहे.शेंगातील त्यामुळे दाणे काळे पडत आहेत. पाऊस जर असाच राहिला तर शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागणार नाही. परतिच्या पावसामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. ( विक्रम गायकवाड ,शेतकरी बुध )

छायाचित्र - बुध -  रोज पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांची सोयाबीन तसेच काढणी योग्य झालेली खरीप पिके पाण्यात. छाया - प्रकाश राजेघाटगे