संवादिनीचे अध्यक्ष अगस्ती अरुण लावंड यांच्या प्रयत्नांना यश अनेक वर्षांची प्रतिक्षा संपली खातगुणवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण
बुध दि . (प्रकाश राजेघाटगे):
स्वातंत्र्य सैनिकांचा वारसा असलेल्या सातारा जिल्ह्यातील मौजे खातगुण अखेर आज दसऱ्याच्या मुहूर्तावर एस. टी. गाडी आली. यावेळी फलटण - वडूज व वडूज - सातारा या गाड्यांचे पूजन सरपंच अमिना सय्यद, उपसरपंच बाळासाहेब लावंड, सोसायटी चेअरमन ज्ञानदेव लावंड, माजी चेअरमन विजय लावंड, देवस्थान चेअरमन अरुण यादव, राव यादव, खातगुण ग्रामपंचायतीचे सर्व सभासद व सोसायटी मेंबर, गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. याप्रसंगी एसटी चालक व वाहक यांचा शाल व श्रीफळ देऊन अरुण विठ्ठल लावंड यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
खातगुण गावात एस. टी. थांबा मिळावा यासाठी अगस्ती अरुण लावंड यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले, त्यामुळे त्यांचे आभार गावकऱ्यांनी मानले. खातगुणमध्ये एसटी यावी, हीअनेक वर्षांची असलेली मागणी अखेर मंजूर झाली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे संवादिनीचे अध्यक्ष अगस्ती अरुण लावंड यांनी पाठपुरावा केला आणि त्यांनी खातगुणला एसटी थांबा देण्याबाबत संबंधितांना उचित सूचना दिल्या. यामुळे आज एसटी सुरू झाली. खातगुणच्या विद्यार्थी व आजारी रुग्ण / वृद्ध आणि भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
क वर्ग देवस्थान असलेल्या खातगुणमध्ये देशाच्या स्वातंत्र्याच्या पंचात्तरीनंतरही साधी एस.टी. आलेली नव्हती यांची खंत गावकऱ्यांच्या मनात होती. गावची लोकसंख्या सुमारे 4000 च्या आसपास आहे. गाव मोठे असले तरीकॉलेजची व्यवस्था नाही. गावात दवाखाने नाहीत. त्यामुळे विद्यार्थी व आजारी रुग्ण / वृद्ध यांना तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे खटाव, पुसेगाव, कोरेगाव, फलटण वा साताऱ्याला जावे लागते. पण तिथे जाण्यासाठी गावाच्या बाहेर 2 ते 2.30 किमी मुख्य रस्त्यावर येऊन एस. टी. पकडावी लागते.
याचा फटका विद्यार्थ्यांच्या विशेषतः मुलींच्या शिक्षणावर पडत आहे. शाळा, कॉलेजच्या हजेरीवर याचा परिणाम होत होता. मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण होतो. रुग्ण व वृद्ध यांना खाजगी गाडी करून जावे लागत होते.
खातगुण गावात प्रसिद्ध राजेबागसार पीरसाहेबांचा दर्गा आहे. तिथे आजूबाजूच्या परिसरातून शेकडो भाविक येत असतात. पण ज्यांच्याकडे खाजगी गाड्या आहेत, तेच येऊ शकतात. गरीब भाविकांची प्रचंड गैरसोय होत होती. गाव तिथे एस. टी. हे आपलं ब्रीद आहे. पण खातगुण गावाने एस. टी. पाहिलीच नव्हती. पूर्वी रस्ते चांगले नाहीत हे कारण होतं, पण आता रस्ते ठीक आहेत. मुख्य रस्तावरून गावात एस. टी. यायला जेमतेम 2 मिनिट लागतात. अशी परिस्थिती अगस्ती लावंड यांनी एसटी व्यवस्थापकीय संचालक यांना सांगितली होती. लेखी निवेदन देऊन पाठपुरावा केला.
अगस्ती लावंड यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत एसटीच्या व्यवस्थापकीय संचालक यांनी याबाबत तातडीने संबंधितांना उचित कार्यवाहीचे आदेश दिले होते. आता दसऱ्याच्या मुहूर्तावर खातगुणमध्ये एसटी आल्याने गावकऱ्यांमध्ये आनंदाचे। वातावरण आहे.





Social Plugin