Ticker

6/recent/ticker-posts

अन् आमदार पोहोचले भाजी मंडईत..


सिद्धार्थ खरात यांनी खरेदी केला भाजीपाला

प्रतिनिधि @ रामेश्वर तोंडे लोणी गवळी 

 ताजी भाजी ही दररोज खरेदी करावी लागते. मुंबईत मंत्रालयात नोकरी करत असतानाही सिद्धार्थ खरात व त्यांची कुटुंबीय एक चाकरमानी जीवन जगत होते, आजही तेच जगणं कायम आहे.. ते दिसलं मेहकरात. जानेफळ रोडवरील भाजी मंडईत जाऊन त्यांनी एका सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे भाजी तर खरेदी केली, मात्र आमदार भाजीपाला खरेदीसाठी आल्याचे पाहून नागरिकांची तिथेच त्यांच्या अभिनंदनासाठी एकच झुंबड उडाली !

सिद्धार्थ खरात हे नुकतीच मेहकर मतदार संघाचे आमदार म्हणून निवडून आले आहेत, विजयी झाल्यावर ते एकदाच मुंबईला पक्षाच्या कामासाठी गेले. तिथून थेट पोहचले ते मेहकर मतदार संघात. सध्या त्यांचा मुक्काम मेहकर येथील म्हाडा कॉलनीत भाड्याने घेतलेल्या घरात आहे, त्या घराला त्यांनी 'यामिनी' नाव दिले आहे. याच घरात त्यांच्या भाऊ, वहिनी, पुतण्या, ड्रायव्हर व काही कार्यकर्ते मुक्कामाला असतात. म्हणजे एक भलं कुटुंबच त्यांचे मेहकरात स्थायीक झालं आहे.

त्यांच्या पत्नी तथा मंत्रालय सचिव सुवर्णाताई जेव्हा मेहकरला येतात, तेव्हा याच घरात राहतात. बाहेरून खाण्यासाठी काही येत नाही व हॉटेलमध्ये कोणीही जात नाही, सकाळपासून संध्याकाळपर्यंत वर्दळ असतेच. सारा स्वयंपाक व येणाऱ्यांचा चहा-पाणी नाश्ता याच घरात तयार होतो. त्यामुळे भाजीपाला ही दैनंदिन गरज आहे. हाच भाजीपाला खरेदीसाठी आ. सिद्धार्थ खरात हे जानेफळ रोडवरील भाजी मंडईत अगदी सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे पोहोचले. ताजी भाजी पाहून ते तिथे थांबले.

त्यांचा भाजी खरेदीचा मोह अनावर झाला. भाज्यांचे प्रकार व भाज्यांचे भाव याची त्यांनी सर्वसामान्य ग्राहकाप्रमाणे चौकशी केली. मेथी व शेपूची भाजी तर शेंगडे त्यांनी विकत घेतले. भाजी विक्रेत्यांच्या समस्या जाणून घेतल्या, एकूण बाजाराची माहिती घेतली. आमदार बनल्यावरही एक माणूस किती जमिनीवर राहू शकतो, याची प्रचिती यानिमित्ताने आली. नंतर काही लोकांच्या लक्षात आले की, आमदार भाजी खरेदीसाठी आले आहे.. मग तिथेच अभिनंदनासाठी एकच गर्दी झाली !