बुध दि .[ प्रकाश राजेघाटगे ]
उत्तम बियाणे, योग्य लागवड पद्धती, पाण्याचे योग्य नियोजन, योग्य प्रकारच्या खतांचा वापर, आणि मनापासून कष्ट करण्याची तयारी असेल तर शेती हा उदरनिर्वाहाचा आणि अर्थार्जनाचा उत्तम पर्याय होऊ शकतो हे आजवर अनेक यशस्वी शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. असेच एक उत्तम उदाहरण पुसेगाव येथील प्रगतशील शेतकरी श्री. सुरेश लक्ष्मण जाधव यांनी यावर्षी आपल्या ऊस शेतीच्या भरघोस उत्पन्नातून दाखवून दिले आहे.सुरेश जाधव यांनी यावर्षी एक एकरामध्ये तब्बल 120 टन ऊस घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर एक वेगळा आदर्श उभा केला आहे.
पुसेगाव फलटण रस्त्यालगत पुसेगाव पासून केवळ एक किलोमीटर अंतरावर मुख्य रस्त्यालगत श्री. सुरेश जाधव यांचे शेतीक्षेत्र असून दरवर्षी आले, कांदा व बटाटा अशी मुख्य पिके ते घेत असतात. यावर्षी पहिल्यांदाच या क्षेत्रामध्ये त्यांनी 86032 या जातीच्या ऊसाची लागण केली. साडेचार फुटावरची लागण, उत्तम बियाणे, ड्रिप इरिगेशन द्वारे पाण्याचे योग्य नियोजन, शेणखत तसेच रासायनिक खतांचा योग्य प्रमाणात वापर करून त्यांनी यावर्षी त्यांच्या एक एकर क्षेत्रामध्ये तब्बल 120 टनाचे उत्पादन काढण्यात यश मिळवले आहे. 32 ते 35 पेऱ्यापर्यंत या उसाची वाढ झाली होती. नुकताच गाळपासाठी जरंडेश्वर कारखाना कोरेगाव येथे त्यांचा ऊस देण्यात आला असून काही शेतकऱ्यांनी उत्तम बियाणे म्हणून देखील त्यांच्या उसाची मागणी केली आहे.
श्री सुरेश जाधव हे सिद्धनाथ बँकेचे माजी संचालक असून शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. शेतीची अत्यंत आवड असल्याने पहिल्यापासूनच कांद्याचेही विक्रमी उत्पादन घेऊन त्यांनी लौकिक मिळवला आहे. त्यांच्या या प्रयोगशील शेती बद्दल आणि विक्रमी उत्पन्नाबद्दल त्यांचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे





Social Plugin