Ticker

6/recent/ticker-posts

पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानावर उडणार बैलगाडी शर्यतीचा धुरळा


२७ डिसेंबर रोजी आयोजन,  बैलगाड्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू होणार, मैदानावर ड्रोन कॅमेऱ्यांची राहणार नजर

 बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

प.पू. श्री सेवागिरी महाराजांच्या ७७व्या पुण्यस्मरणनिमित्त शुक्रवार २७ डिसेंबर रोजी राज्यातील लाखो बैलगाडी शर्यत शौकिनांचे आकर्षण असलेल्या पुसेगाव  येथील 'श्री सेवागिरी हिंदकेसरी' मैदानावर बैलगाड्या शर्यतीचा धुरळा उडणार आहे. बैलगाड्यांच्या शर्यतीचे अत्यंत पारदर्शक मैदान म्हणून राज्यभर नावलौकिक असलेल्या पुसेगावच्या या आखाड्यात यंदा सर्वानुमते काटेकोर नियम तयार करण्यात आल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती महंत प.पू. सुंदरगिरी महाराज व ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव यांनी दिली.श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट कार्यालयात झालेल्या बैलगाडी शर्यत कमिटीच्या बैठकीस मठाधिपती प.पू. सुंदरगिरी महाराज, चेअरमन डॉ. सुरेश जाधव, माज़ी चेअरमन रणधीर जाधव, संतोष जाधव, विश्वस्त संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव तसेच बैलगाडी शर्यत कमिटीचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

शर्यतीमधील प्रथम दहा क्रमांकाच्या विजेत्या बैलगाडी मालकांना अनुक्रमे दोन लाख ७७ रुपये, एक लाख ७१ हजार ७७ रुपये, एक लाख ५१ हजार ७७ रुपये, एक लाख २५ हजार ७७ रुपये, एक लाख ७७ रुपये,, ७५ हजार ७७ रुपये, ५० हजार ७७ रुपये, ४० हजार ७७ रुपये, ३० हजार ७७ रुपये आणि दहाव्या क्रमांकासाठी २० हजार ७७ रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. या शर्यतीसाठी दोन हजार रुपये प्रवेश फी आकारली जाणार आहे. हिंदकेसरी मैदान जिंकणाऱ्या बैलगाडी ड्रायव्हरला श्री सेवागिरी हिंदकेसरी ड्रायव्हर हा किताब देण्यात येणार आहे. तसेच सेमी फायनल आणि गटाच्या प्रत्येकफेऱ्यातील प्रथम दोन क्रमांकाच्या विजेत्या बैलगाडी मालकांना प्रमाणपत्र व ढाल देण्यात येणार आहे.

या शर्यतीसाठी फक्त ११९९ बैलगाड्यांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. १५ ते २५ डिसेंबर सायंकाळी सहापर्यंतच ही मुदत असणार आहे. शर्यतीच्या दिवशी कोणत्याही बैलगाडीची नोंद होणार नाही. गटाच्या चिठ्ठया गुरुवार २६ रोजी दुपारी एक वाजता सर्वांच्या समक्ष तसेच ऑनलाईन पद्धतीने काढण्यात येणार आहेत शनिवार २७ रोजी सकाळी सात वाजता मानाचा नारळ फोडून पहिला फेरा सुरू होणार आहे. यावर्षी बैलगाडी शर्यतीसाठी मैदानाची आदर्शवत रुपरेषा तयार करण्यात आली आहे. १५ फूट रुंद आणि ९२० फूट लांब अशा एकसमान १५ धावपट्ट्या असतील. धावपट्टीच्या बाजूला सुमारे ९०० फूट लांबीचे बॅरिगेट्स बसविण्यात येणार आहेत. प्रेक्षकांना बसण्यासाठी बाजूला मंडपासह सुमारे ७०० फूट गॅलरीची सोय करण्यात येणार आहे. 

पारदर्शक निकाल आणि अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुटीच्या ठिकाणी, निकाल रेषेवर आणि मैदानात प्रत्येकी दोन ड्रोन वें मेरे असणार आहेत. लाईव्ह वें मेरे आणि मोठ्या स्क्रीन मैदानात लावण्यात येणार आहेत. मैदानात बैल आणि बैलगाडी मालकांसाठी आरोग्यविषयक आणि आवश्यक त्या सर्व सोयीसुविधांची व्यवस्था करण्यात येणार आहे. मात्र शर्यती पाहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाने आपापल्या परीने काळजी घ्यावी, असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.  आखाड्यात पाणी आणि लाईटची सोय करण्यात येणार असल्याचे मठाधिपती प.पू. सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, बाळासाहेब जाचव, संतोष वाघ, सचिन देशमुख व गौरव जाधव यांनी दिली.      

 बैलगाडी क्षेत्राचा वर्ल्डकप...

पुसेगावचे पारंपरिक हिंदकेसरी मैदान बैलगाडी शर्यत क्षेत्रात वर्ल्डकप समजला जातो. या ठिकाणी फायनल जिंकणाऱ्या बैलांचा आणि त्यांच्या मालकांचा संपूर्ण देशात नावलौकिक होतो. गेल्या वर्षी सेवागिरी हिंदकेसरीचा किताब मिळविल्यानंतर हरण्या-राजा या जोडीची क्रेझ देशभर सुरू झाली. त्यामुळे एकदा तरी पुसेगाव मैदानात एक नंबर करायचाच असे प्रत्येक बैलगाडी मालकाचे स्वप्न असते. -  डॉ. सुरेश जाधव, ट्रस्ट चेअरमन