Ticker

6/recent/ticker-posts

वृद्धाची सोन्याची चेन पळवणारा ताब्यात



                    पुसेगाव पोलिसांची कारवाई, दीड वर्षापूर्वी घडली होती घटना

बुध  दि .[ प्रकाश राजेघाटगे ] 

दीड वर्षापूर्वी राजापूर (ता. खटाव) येथील ज्येष्ठ नागरिक माजी सरपंचांच्या गळ्यातील सुमारे एक लाख रुपये किमतीची सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून घेऊन पळून गेलेल्या संशयित आरोपीच्या पुसेगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्याची माहिती पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप पोमण यांनी दिली. संतोष सूर्यवंशी (रा. कळसकरवाडी, कुळकजाई, ता. माण) असे संशयित आरोपीचे नाव असून वडूज न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास राजापूर गावच्या हद्दीतील जरांबी वस्तीशेजारी माजी सरपंच हणमंत दगडू घनवट (वय ७४) हे घरासमोरील अंगणात शतपावली करीत होते. त्यावेळी घराच्या दक्षिण बाजूच्या बोळातून संतोष सूर्यवंशी याने पाठीमागून अचानक येऊन घनवट यांच्या गळ्यातील एक लाख पाच हजार ७१० रुपये किमतीची सुमारे १९.२४० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हिसकावून पळून गेला होता.

या प्रकरणाचा तपास करीत असताना सहाय्यक फौजदार चंद्रहार खाडे, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी अनेकदा शोध घेऊन माहिती काढून पाठलाग केला. परंतु प्रत्येक वेळी कुळकजाई डोंगर पठारातून संशयित पळून जाण्यात यशस्वी होत होता. रविवारी रात्री रचलेल्या सापळ्यातूनही तोः पळून जात असताना तपास पथकाने पाठलाग करून त्यास जेरबंद केले. वडूज न्यायलयाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक संदीप पोमण करीत आहेत.