अंबड तालुका प्रतिनिधी मयूर वाव्हळ
अवैध प्रकार थांबवण्याचे मुख्यमंत्र्यांना साकडे अंबड शहरासह तालुक्यातील अवैध धंदे तत्काळ बंद करण्यात यावेत. वाढत्या गुंडगिरीसही आळा घालण्यात यावा. अंबड बसस्थानकातील चोऱ्या व मुलींची छेडछाड थांबविण्यासाठी येथे कायमस्वरूपी पोलीस चौकी सुरू करण्याबाबत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे युवा सेनेचे जालना जिल्हा समन्वयक विष्णू सोनवणे यांनी केली आहे.
जालना जिल्ह्यातील अंबड शहरासह तालुक्यात अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला आहे. अंबड शहरात मटका, जुगार अड्डे बहरले आहेत. अवैध दारूचा महापूर आला आहे. अवैध शस्त्र बाळगणे, गुटखा व गांजाची सर्रास विक्री, चक्री, लॉटरी शिवाय महिला-मुलींची भरदिवसा छेडछाड असे प्रकार सुरू आहेत. रोडरोमिओ कडून विद्यार्थिनींचा पाठलाग व छेडछाड होत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच एका मुलीने छेडछाडीला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून पोलिसांनी रोमिओचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. अंबड मुलींची सुरक्षा वाढवावी
अंबड शहरात आज सर्वसाधारण कुटुंबातील पालकांसमोर आपल्या मुलींना शाळा, महाविद्यालयात पाठवावे की नाही असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सकाळी घराबाहेर पडलेली मुलगी पुन्हा सुरक्षित घरी येईल का नाही याची खात्री राहिली नसल्याने पालकांना नित्य मोठी चिंता सतावत आहे. परिणामी शहरातील सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करण्यासह वाढत्या गुंडगिरीसही आळा घालण्यात यावा. शिवाय, अंबड बसस्थानकातील चोऱ्याव मुलींची छेडछाड थांबविण्यासाठी त्या ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस चौकी सुरू करण्याबाबत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत, अशी मागणी सोनवणे यांनी या निवेदनात केली आहे.
बसस्थानकात दागिने चोरी, पॉकेटमार, मुलींची छेडछाड असे प्रकार सर्रासपणे घडत आहेत. मोबाईल, मोटार सायकल चोऱ्या वाढल्या आहेत. एकंदरीत गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याबाबत अंबड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक जालना यांना अनेक निवेदने देऊनही या अवैध धंद्याचा बंदोबस्त करण्यात आलेला नाही.
.jpeg)




Social Plugin