(श्री शिव महापुराण कथा, नवचंडी होम, ज्ञानयज्ञ सोहळ्यासह विविध कार्यक्रम)
आष्टा /प्रतिनिधी
आष्टा येथील श्री चौंडेश्वरी देवीचा शाकंभरी नवरात्र महोत्सव दि. ६ ते १३ जानेवारी २०२५ या कालावधीत संपन्न होणार आहे. यामध्ये श्रीधाम वृंदावनचे कथा प्रवक्ते आचार्य श्री. ह. भ. प. विनोद कृष्ण शास्त्रीजी यांच्या श्री शिव महापुराण कथा, नवचंडी होम, ज्ञानयज्ञ सोहळा यासह विविध धार्मिक, पारंपरिक, प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजक श्री चौंडेश्वरी देवी शाकंभरी नवरात्र महोत्सव यांचेकडून देण्यात आली.
आष्टा नगरीचे ग्रामदैवत म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या श्री चौंडेश्वरी देवीचा श्री शाकंभरी नवरात्र उत्सव दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठया प्रमाणात साजरा होत आहे. सोमवार दि. ६ रोजी दुपारी ३.०० वाजता श्रीराम मंदिर पासून याचा प्रारंभ होईल. यावेळी श्री शिव महापुराण ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आंतरराष्ट्रीय वारकरी किर्तनकार, कथा प्रवक्ते श्री. ह. भ. प. विनोद कृष्ण शास्त्रीजी यांची शोभायात्रा निघेल. यांचे समवेत यावेळचे यजमान सौ. व श्री. सोमाजी बाळासो माने व सौ. व श्री. प्रविण बाळासो माने यांची शोभायात्रा व नगरप्रदक्षिणा निघणार आहे.
या नवरात्र महोत्सवात मंगळवार दि. ७ ते १३ पर्यंत दररोज पहाटे ४ ते ६ आदिशक्ति श्री चौंडेश्वरी देवीस महाभिषेक, दररोज पहाटे ६ ते ७ 'ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे' या देवी मंत्राचा सामुदायिक जप, दररोज सकाळी व सायंकाळी ७.३० ते ९.३० छबिना व आरती, सकाळी ९ .३० ते ११ श्री दुर्गा सप्तशती पाठ व दुपारी १ ते ३ नामांकित भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. तर दि. ७ ते १२ रोजी दुपारी ४.३० ते ७.३० यावेळेत श्रीधाम वृंदावन येथील आंतरराष्ट्रीय कथा प्रवक्ते श्री विनोद कृष्ण शास्त्री हे 'श्री शिव महापुराण कथा' सादर करणार आहेत.
त्याचप्रमाणे दररोज रात्री ९ ते ११ या वेळेत विविध धार्मिक, पारंपरिक, प्रबोधनपर कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये मंगळवार दि. ७ रोजी शिवचरित्रातील मातृशक्ती विषयावर डॉ. अमर अडके यांचे व्याख्यान तर बुधवार दि. ८ रोजी भारतीय संस्कृतीचा विश्वसंचार या विषयावर ईश्वर रायण्णावर यांचे व्याख्यान व गुरुवार दि. ९ रोजी प्रा. संजय थोरात यांच्या विनोदी गुदगुल्या आहेत. तसेच शुक्रवार दि. १० रोजी महेश नवाळे यांची भक्तीगीते व भावगीते असतील तर शनिवार दि. ११ रोजी बदलत्या काळातील मातृ संस्काराची गरज यावर सुनिल लाड यांचे व्याख्यान व त्यानंतर रात्री ११ वाजता जागरण गोंधळाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच रविवार दि. १२ रोजी संगीत आनंद ही हिंदी - मराठी गीतांची बहारदार मैफिल असणार आहे.
शिवाय सोमवार दि. १३ रोजी पहाटे ५ ते ११ नवचंडी होम व पूर्णाहुती, सकाळी ९ वाजता सहस्त्रकुमारी पूजन व सकाळी १० वाजता सहस्त्र सौभाग्यवती (सुवासिनी) पूजन होईल. तसेच सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन केले आहे. तरी याचा लाभ आष्टा व पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी घ्यावा असे आवाहन श्री शाकंभरी नवरात्र महोत्सव यांचेकडून करण्यात आले आहे.





Social Plugin