Ticker

6/recent/ticker-posts

सक्षम बीज हेच समृद्ध साहित्य निर्मितीचे मूलभूत अंग आहे.- प्रा.डॉ.अशोक शिंदे,



बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]

 साहित्य हा कलाप्रकार प्रतिभा नावाच्या शक्तीने तयार होतो. कवितेत उत्कट व उत्स्फूर्त संवेदनशील भावनाचे प्रकटीकरण होत असते. आपल्या अवतीभवतीच्या व्यक्ती, घटना, प्रसंग यांच्या निरीक्षणातून काव्य संवेदना जागृत होतात. ह्याच संवेदना म्हणजे काव्य बीज होय. काव्य बीजे जेव्हा शब्द रूपाने व्यक्त होतात, तेव्हा कविता जन्माला येते. हीच सक्षम बीज साहित्य निर्मितीचे मूलभूत अंग आहे. असे प्रतिपादन मुधोजी महाविद्यालयातील मराठी विभागातील प्रा.डॉ.अशोक शिंदे यांनी केले. अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत व मराठी विभागाने आयोजित केलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त 'साहित्य लेखन कार्यशाळेत' ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.ए. एस. जगताप, प्रा.डॉ.संजय क्षीरसागर , प्रा.एल. के. पवार प्रा.डॉ.एन.डी. लोखंडे, प्रा.डॉ.के. एम. निंबाळकर, प्रा. एस.डी. वाघमारे प्रा. एम.एन. आवळे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. शिंदे आपल्या भाषणात पुढे म्हणाले,'प्रत्येक व्यक्ती आपल्या कल्पनाविचार भावना व्यक्त करण्यासाठी एका विशिष्ट अशा माध्यमांचा वापर करतात त्यामध्ये चित्रकला, शिल्पकला, संगीत आणि विविध साहित्य कलाकृतींच्या माध्यमांचा वापर होताना दिसतो. 

इतर कला ह्या विशिष्ट अशा साधनांच्या माध्यमातून प्रकट होताना दिसतात. परंतु साहित्य कला ही फक्त शब्दांच्या माध्यमातून प्रकट होत असते. कविता या साहित्य कलेमधून व्यक्ती आपल्या मनातील भावना, कल्पना, विचार शब्दरूपाने व्यक्त करत असतो याच शब्दरूपाला काव्य बीजाची लयबद्ध शब्द, प्रतिमा, प्रतीके, रस निर्माण झाल्यानंतर कविता अधिकच सकस होते. आई हे कवितेचे पहिले काव्य बीज असते, कारण आपणास आईचा सहवास अधिकच लाभलेला असतो. कवी आपल्या अवतीभवती डोळसपणे पहात असतो. कवीला दिसलेले जग हे सूक्ष्म निरीक्षण शक्तीच्या आधारे टिपता आलेत तरच उत्कृष्ट कविता निर्माण होते. कवितेच्या  निर्मितीसाठी चांगल्या कवितांचे प्रथम वाचन करावे लागते, नंतर कविता व्यवस्थित समजून घ्यावी   लागती. कार्यक्रम प्रसंगी 'आई','हरवलं माझं गाव',या कवितांचे सादरीकरण केल्याने विद्यार्थी विद्यार्थिनी मंत्रमुग्ध झाले होते. अध्यक्षीय मनोगतामधून प्रा.डॉ ए.एस. जगताप यांनी माणसाच्या आयुष्यात काव्याचे महत्त्व खूप असते याविषयी आपले विचार व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर.पी. भोसले यांनी मार्गदर्शन केले. आभार प्रा.एस.डी.वाघमारे यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.