यशवंत पवार @ छत्रपती संभाजीनगर जिल्हा ग्रामीण प्रतिनधी
कन्नड तालुक्यातील 2 भीषण अपघातांत तीघांचा मृत्यू झाला घटना पहिली : दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन जुनेद अहमद शेख (वय ३५, रा. पिशोर) व सक्रू रामचंद्र राठोड (वय ५५, रा. तेलवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला.
ही दुर्घटना सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर कालीमठ फाटा (ता. कन्नड) येथे रविवारी (९ फेब्रुवारी) सायंकाळी साडेचारला घडली. पिशोर येथील जुनेद शेख कन्नड येथून दुचाकीने (एमएच २० डीएक्स ८३६१) ने चाळीसगाव येथे बहिणीला भेटायला जात होते. तेलवाडी येथील सक्रू राठोड दुचाकीने (क्र. एमएच २० एफएच १५८६) कन्नडला जात होते. दोन्ही वाहनांची कालीमठ फाटा येथे समोरासमोर धडक झाली. दोघांनाही ग्रामस्थांनी त्यांना कन्नडच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासून दोघांनाही मृत घोषित केले. कन्नड ग्रामीण पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे.
घटना दुसरी : कन्नड तालुक्यातील जवखेडा येथील सागर दिगंबर काचोळे (वय २५) रविवारी (९ फेब्रुवारी) सकाळी वाकदकडून जामडीमार्गे दुचाकीने (क्र. एमएच २० पीएच ०७६०) जवखेडा खुर्दकडे येत होता. अज्ञात वाहनाने त्याला उडवले. गंभीर जखमी झालेल्या सागरला ग्रामस्थांनी पिशोर ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनेची नोंद पिशोर पोलिसांनी घेतली आहे.
सागरच्या पार्थिवावर जवखेडा खुर्द येथे दुपारी चार ला अंत्यसंस्कार करण्यात आले.दीड वर्षापूर्वी सागरच्या मोठ्या भावाच्या पत्नीचे प्रसुतीदरम्यान निधन झाले होते. त्यानंतर सहाच महिन्यांनी मोठ्या भावाचाही अल्प आजाराने मृत्यू झाला. आता सागरचाही अपघाती मृत्यू झाल्याने सागरची आई व मोठ्या भावाचा मुलगा असे दोघेच कुटुंबात उरले आहेत.





Social Plugin