बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
खटाव तालुक्यातील जाखणगावनजीकच्या रामोशीवाडी (मेघलदर वस्ती) च्या परिसरात सुमारे ५० ते ५२ वर्षीय एक पुरुष कित्येक दिवस फिरत होता. ही बाब निदर्शनास येताच गावचे पोलिस पाटील, गावातील युवा कार्यकर्ता आणि पुसेगाव पोलिस ठाण्याच्या सहकार्याने त्या व्यक्तीला त्याच्या घरच्या लोकांच्याकडे सुखरूप हवाली केले. बापू गोविंद कुंभार (रा. रुळे, ता. वेल्हे, जि. पुणे), असे त्या व्यक्तीचे नाव आहे.
रामोशीवाडीचे पोलिस पाटील सुप्रीम मदने यांनी दि. २१ रोजी सकाळी त्याच गावातील सामाजिक कार्यकर्ते युवराज मदने यांच्या मदतीने फिरणाऱ्या त्या व्यक्तीला पुसेगाव पोलिस ठाण्यात आणले. सहायक पोलिस निरीक्षक संदीप पोमण यांनी तत्काळ त्यांचे सहकारी योगेश बागल व दऱ्याबा नरळे यांना या व्यक्तीच्या नातेवाइकांचा शोध घेण्याबाबत मार्गदर्शन केले. पोलिस ठाण्याच्या अंमलदारांनी त्या व्यक्तीस विश्वासात घेऊन त्याच्याशी बराच वेळ संवाद साधून त्याचे कुटुंबीय व नातेवाइकांची चौकशी करत माहिती काढली. वेल्हे पोलिस ठाणे, रुळेचे पोलिस पाटील यांच्याशी संवाद साधून व्यक्तीचा मुलगा प्रशांत कुंभार यांच्याशी संपर्क केला. मुलाच्या सांगण्यावरून आदेश कोकणे (राजवडी, ता. इंदापूर) व इतर नातेवाइक पुसेगाव ठाण्यात आल्यानंतर संबंधित व्यक्तीस पुसेगाव पोलिसांनी नातेवाइकांच्या ताब्यात दिले.





Social Plugin