Ticker

6/recent/ticker-posts

चिंचोली येथील २० वर्षीय तरुणीचा पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू,



यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे✒️


यावल तालुक्यातील चिंचोली येथे शेत विहिरीत बकऱ्यांसाठी पाणी भरण्याकरिता गेलेल्या २० वर्षीय तरुणीचा पाय घसरला आणि ती पाण्यात बुडाली, ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली होती, सदर तरुणी घरी परतली नाही म्हणून तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला, विहिरीजवळ बादली आणि हंडा दिसून आला. बुधवारी सकाळपासून शोध मोहिम सुरू करण्यात आली व तिचा मृतदेह विहिरीत मिळून आला, याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चिंचोली ता.यावल येथील रहिवाशी प्रज्ञा सुरेश साळुंखे वय २० ही तरुणी मंगळवारी शेत शिवारात त्यांच्या बकऱ्यांच्या गोठ्यात गेली होती व बकऱ्यांना पाणी पाजण्याकरिता ती तिच्या गोठ्यालगत असलेल्या भागवत रामचंद्र पाटील यांच्या शेतात विहिरीवर गेली तेथे गुंडा आणि बादली घेऊन ती विहिरीवर वरून पाणी भरत होती, दरम्यान तिचा पाय घसरला आणि ती विहिरीत पाण्यात बुडाली, मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ती घरी परतली नाही म्हणून कुटुंबाकडून तिचा रात्री शोध घेण्यात आला,विहिरीजवळ बादली आणि हंडा मिळून आल्यामुळे त्यांनी रात्री विहिरीत डोकावून पाहिले मात्र, काही दिसले नाही तेव्हा बुधवारी सकाळपासून विहिरीत शोध घ्यायला सुरुवात केली,पोलीस पाटील राकेश साठे, सरपंच अनिल साळुंखे, ग्रामपंचायतचे सदस्य मुकेश साळुंखे, प्रशांत कोळी, प्रभाकर साळुंखे यांनी विहिरीजवळ धाव घेतली व यावल पोलिसांना माहिती देण्यात आली,यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी घटनास्थळी तातडीने पोलीस हवालदार संदीप सूर्यवंशी, किशोर परदेशी यांना पाठवले, विहिरीत प्रचंड पाणी असल्यामुळे या तरुणीचा शोध घेण्याकरिता पाण्यात बुडणारे कॅमेरे मागवण्यात आले. व ती विहिरी खोल पाण्यात तळाशी असल्याचे दिसुन आले. तेव्हा दुपारी दोन वाजता मृतदेह काढून यावल ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला, येथे वैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार सोनवणे व डॉ.प्रशांत जावळे यांनी शव विच्छेदन केले. तर याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे,पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार वसंत बेलदार करीत आहे.a