यशवंत पवार प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण
[ *शिक्षणातील करिअर च्या वेगळ्या वाटा* या सदराखाली विद्यार्थी शिक्षण घेत असतांना पारंपरिक शिक्षणात वेगळे काय करिअर करता येईल हे शोधून अनेक विद्यार्थी यश संपादन करतात त्यांना त्यांचे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली जात आहे .
आजच्या अंकात *कन्नड येथील अनिल वझरे व बाळू वझरे (तेजश्री डिपार्टमेंट)* यांची भाची *कल्याणी येवला(सटाणा)* हीची भेट झाली असता जी चर्चा झाली ती मुलाखत विद्यार्थी पालक, वाचकांसाठी नक्कीच महत्त्वपूर्ण ठरेल.
*माझ्या करिअर प्रवासाची गोष्ट – एका स्वप्नपूर्तीचा प्रवास*
प्रश्न :- तुझा परिचय आणी शिक्षण.?
कल्याणी: माझे नाव कल्याणी येवला, सटाणा येथिल रहिवाशी असुन , मी सटाणा जि. नाशिक येथे जिजामाता कन्या विद्यालय येथे दहावीत शिकत होते. त्यावेळी शाळेमध्ये माझा प्रथम क्रमांक आला.
प्रश्न:- दहावी नंतर कोणते शिक्षण निवडले ? आणी का?
कल्याणी :- मी दहावी झाले त्यावेळी मी निश्चित केले होते की, मला भारतासाठी उपयोगी पडेल असे काम करायचे आहे. म्हणुन पुढे मी पुण्यात लक्ष्मणराव आपटे प्रशाल प्रशाला पुणे येथे विज्ञान शाखेत प्रवेश घेतला नंतर कला शाखा निवडली.
प्रश्न:- नंतर शाखा का बदलली ?
कल्याणी :- माझा ओढा विज्ञानाकडे कमी आणि सामाजिक शास्त्रांकडे व समाजातील मुलभूत अडचणी समजून घेण्याकडे अधिक होता. त्यामुळे मी ग्रेजुएशन साठी फर्ग्युसन महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश घेतला .
आणि त्याचवेळी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी सुरू केली.
प्रश्न:- सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी कशी केली.
कल्याणी :- सिव्हिल सर्व्हिसेससाठी अभ्यास करताना मी द हिंदु आणि इंडियन एक्सप्रेसमधील विविध प्राध्यापकांचे लेख वाचायला सुरुवात केली. त्यातून मला जाणवलं की ब्युरोक्रसीसह संशोधन व धोरणनिर्मितीही समाजासाठी योगदान देण्याचा एक प्रभावी मार्ग आहे.
प्रश्न:- नंतर पुढे काय केले ?
कल्याणी :- याच प्रेरणेतून पुढे मी पुणे विद्यापीठातून " आंतरराष्ट्रीय संबंध" या विषयात एम.ए. पूर्ण केलं आणि नेटची परीक्षा उत्तीर्ण होऊन भारत सरकारची ज्युनियर रिसर्च फेलोशिप मिळवली. या फेलोशिपच्या आधारावर मी बिट्स, पिलानी येथे पीएच.डी.साठी प्रवेश घेतला. माझा शोधप्रबंध "तिबेटन निर्वासितांच्या आयुष्यावर" आधारित आहे.
प्रश्न:- सायन्स शाखा सोडतांना घरुन काही विरोध झाला का ?
कल्याणी:-सुरुवातीला सायन्स सोडून कला शाखेत प्रवेश घेतल्यामुळे कुटुंब आणि समाजाकडून मोठा विरोध सहन करावा लागला. इंजिनिअरिंग किंवा बिझनेस करण्याची समाजाची मानसिकता असल्यामुळे कला शाखेतून पुढे जाणं आव्हानात्मक ठरलं. बिट्स, पिलानीमध्ये प्रवेश घेतल्यानंतरही मला बिझनेस बॅकग्राऊंडमुळे आवश्यक मार्गदर्शन मिळालं नाही.
पण मी हार मानली नाही. स्वतःचा मार्ग शोधत कठीण प्रसंगांवर मात केली आणि माझा शोधप्रबंध यशस्वीरीत्या पूर्ण केला.
संशोधन आणि पेपर सादरीकरणाचा अनुभव
माझ्या संशोधनादरम्यान मला अनेक व्यासपीठांवर पेपर सादर करण्याची संधी मिळाली, ज्यातून मला माझ्या कामासाठी व्यापक मान्यता मिळाली.
प्रश्न:- या सर्व प्रवासात तुला महत्वाचा टप्पा कोणता वाटतो?
कल्याणी:- तिबेटन निर्वासित प्रशासन (CTA) आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) येथे माझ्या शोधनिबंधांचे सादरीकरण करणं माझ्या करिअरमधील महत्त्वाचा टप्पा ठरला.
CTA येथे माझ्या शोधनिबंधामध्ये तिबेटन निर्वासितांच्या ओळख टिकवण्याच्या संघर्षावर आणि तिबेटन बौद्धधर्माच्या जतनावर सखोल चर्चा केली. त्यावर आलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे मला माझ्या संशोधनाची दिशा अधिक स्पष्ट झाली.
प्रश्न:- आणि JNU मधला अनुभव ?
कल्याणी :- मी JNU मध्ये "Bhagvad Gita’s Impact on India’s conception of New World Order and Human Rights” या विषयावर पेपर सादर केला. या पेपरमध्ये मी भगवद्गीतेतील तत्त्वज्ञानाच्या आधारे भारत कशा प्रकारे नवीन जागतिक प्रादेशिक क्रम तयार करू शकतो, यावर चर्चा केली.
याशिवाय, भगवद्गीतेत अंतर्भूत असलेल्या मानवी प्रतिष्ठेवर आधारित मानवाधिकारांचा संदर्भ देत मी या तत्त्वज्ञानाचा आधुनिक जगातील मोठ्या संघर्षांवर कसा परिणाम होऊ शकतो, यावर विचार मांडला.
प्रश्न:- एकंदरीत या शिक्षणाचा भविष्यात तुझ्यासाठी आणि देशासाठी उपयोग काय ?
कल्याणी :- आतंकवाद, मानवी प्रतिष्ठेचा अपमान, रशिया-युक्रेन युद्ध, इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष सारख्या जटिल जागतिक समस्यांच्या सोडवणुकीसाठी भगवद्गीतेतील मूल्यं मार्गदर्शक ठरू शकतात, असं मी नमूद केलं आहे
माझ्या सादरीकरणाला श्रोत्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला, आणि भारतीय सभ्यतेच्या तत्त्वज्ञानाचा जागतिक संघर्षांवरील प्रभावी उपयोग स्पष्ट करण्यासाठी नवीन चर्चा सुरू झाली आहे .
प्रश्न :- या बाबत अजुन काय सांगता येईल ?
कल्याणी :- तिबेटन निर्वासितांसोबत अनुभव
माझ्या संशोधनाचा मुख्य विषय आहे, तिबेटन निर्वासितांचे अनुभव, त्यांच्या ओळखीचं बदलतं स्वरूप, आणि नव-उदारमतवादी धोरणांचा त्यांच्या जीवनावर होणारा परिणाम आहे. या साठी धर्मशाला, हिमाचल प्रदेश येथे मी बराच काळ घालवला, जिथे तिबेटन निर्वासितांच्या जीवनाच्या विविध पैलूंना जवळून पाहण्याची संधी मिळाली.
तिबेटमधून भारतात येणाऱ्या निर्वासितांचा प्रवास अत्यंत वेदनादायी आहे. हिमालयातील बर्फाळ डोंगरांमधून पायी प्रवास करत, चिनी अधिकार्यांपासून स्वतःचा बचाव करत, ते स्वतःचा आणि त्यांच्या संस्कृतीचा जीव वाचवत भारतात येतात. त्यांच्या संघर्षात केवळ त्यांच्या स्वातंत्र्याची चळवळ दिसत नाही, तर सांस्कृतिक जपणुकीसाठीचा प्रामाणिक प्रयत्नही दिसतो.
माझ्या संशोधनामध्ये विशेषतः तिबेटन युवांचा अभ्यास महत्त्वाचा ठरला. हे तरुण, एकीकडे भारतात निर्वासित म्हणून राहाताना, दुसरीकडे पश्चिमेकडे स्थलांतर करण्याचे स्वप्न पाहतात. हे स्वप्न फक्त आर्थिक स्थैर्यासाठी नाही, तर जागतिक नागरिक म्हणून स्वतःला सिद्ध करण्याचं आहे. त्यांच्या शिक्षणाच्या संधी, रोजगाराचं वातावरण, आणि तिबेटन राष्ट्रवादाच्या भावना यांच्यातील संतुलन त्यांना सांभाळावं लागतं.
तिबेटन निर्वासितांवर नव-उदारमतवादी धोरणांचा कसा परिणाम होतो, हेही मी तपासलं आहे. "आत्मनिर्भरता" ही त्यांच्या पॉलिसीतील महत्त्वाची संकल्पना आहे, पण तिच्यामागील सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक परिणामांचे अनेक पैलू आहेत. विशेषतः तिबेटन तरुणांसाठी हा विचार त्यांच्या ओळख निर्माण करण्याच्या प्रक्रियेचा भाग बनतो.
प्रश्न :- तुझी भविष्यासाठी दिशा काय असेल ?
कल्याणी :- आज मी संशोधन, धोरणनिर्मिती आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजासाठी योगदान देण्याचा प्रयत्न करत आहे. तिबेटन निर्वासितांचे प्रश्न, त्यांची ओळख, आणि त्यांचे समाजातील स्थान, बौद्ध धर्मातून मिळालेली शांततावादी शिकवण यावर काम करताना मला वाटतं, हे फक्त संशोधन नाही, तर मानवतेसाठी योगदान ठरनार आहे.
कल्याणी येवला हिच्या भविष्यातील योजने साठी दै.महाराष्ट्र ग्रामीण च्या शुभेच्छा.





Social Plugin