Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षणातून समाजातील घटकांचा सन्मान करणारी संस्कृती निर्माण झाली पाहिजे : श्रीकृष्ण कटकधोंड



संदिप गावडे @  प्रतिनिधी 

        मानवी जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाची आवश्यकता असते. बदलत्या तंत्रज्ञानानुसार कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) विश्वात रोज नवनवीन शोध लागत आहेत. पण दुर्दैवाने त्यातून सामाजिक भान हरवल्याने महिलांवरील अत्याचार, आई-वडिलांना न सांभाळणारी पिढी, वाढती गुन्हेगारी या समस्या निर्माण झाल्या आहेत. यावर उपाय म्हणून शिक्षणातून समाजातील सर्व घटकांचा विशेषत: स्त्रियांचा सन्मान करणारी एक आदर संस्कृती तयार व्हावी. असे प्रतिपादन आष्टा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांनी केले. 

       कासेगाव शिक्षण संस्थेच्या आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज, आष्टा या महाविद्यालयातील वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव मा. प्राचार्य आर.डी.सावंत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अरुण पाटील, संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सिलचे नवनियुक्त सदस्य शिवाजी रकटे आणि विश्वनाथ जाधव, कार्याध्यक्षा प्रा. लता देशमुख, विद्यार्थी प्रतिनिधी कु. अनुराधा गुरव उपस्थित होते.

      यावेळी कटकधोंड पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांना शिक्षण संपल्यानंतर बाहेरच्या जगात प्रवेश केल्यावर आयुष्याची खरी परीक्षा काय असते हे समजते. त्यांच्या आयुष्याच्या जडणघडणीत आई-वडिल व गुरुजनांचे मोठे योगदान असते. त्यामुळे आयुष्यात यशस्वी होण्यासाठी त्यांचा आदर करा व त्यांचा आशीर्वाद मिळवा. असे आव्हानही त्यांनी केले.

   यावेळी संस्थेचे सचिव प्रा. आर.डी.सावंत म्हणाले, मानवामध्ये इतर प्राण्याप्रमाणे उपजत आणि नैसर्गिक दुर्गुण असतातच. पण ते दूर करण्यासाठी मानवी मनाची मशागत करणे आवश्यक असते. शिक्षण यावर उत्तमरित्या काम करते. शिक्षणामुळे आत्मपरीक्षण करण्यासाठी बळ मिळते. प्रत्येकाने कर्माच्या सिद्धांतावर विश्वास ठेवून, कठोर आत्मपरीक्षण करून आपले जीवन जगले तर आदर्श समाज अस्तित्वात येऊ शकतो.

        या कार्यक्रमात गतवर्षीच्या बोर्ड आणि विद्यापीठ परीक्षेत गुणवत्ता धारण केलेल्या विद्यार्थ्यांना तसेच क्रीडा आणि इतर स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांनी तर अहवाल वाचन कार्याध्यक्षा प्रा.सौ. लता देशमुख मॅडम यांनी केले. तसेच आभार अनुराधा गुरव हिने तर सूत्रसंचालन प्रा. सौ. शैलजा टिळे आणि प्रा. राजेंद्र प्रधान यांनी केले. 

     या कार्यक्रमाला महाविद्यालय विकास समितीचे सदस्य शकील मुजावर, माजी नगरसेविका तेजश्री बोंडे, समीर गायकवाड, अनिल पाटील, एन. डी. कुलकर्णी, सुनिल माने, राजेंद्र गुरव, एस.जे.मोरे, प्रा. दशरथ पाटील आदी मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.