संदिप गावडे @ प्रतिनिधी
इस्लामपूर बिझनेस फोरमच्या वतीने इस्लामपूर येथे 'आयबीएफ एक्स्पो २०२५' चे आयोजन करण्यात आले आहे. येथील आ. जयंत पाटील खुल्या नाट्यगृहात दिनांक १८ ते २१ फेब्रुवारी दरम्यान हे प्रदर्शन होणार आहे. अशी माहिती आयबीएफचे संस्थापक प्रतीकदादा पाटील व अध्यक्ष विकास राजमाने यांनी पत्रकार परिषदेत दिली .
यावेळी प्रतिकदादा पाटील व राजमाने म्हणाले, मुंबई येथील 'बीएनआय' या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूर शहरातील तसेच वाळवा तालुक्यातील व्यापारी उद्योजक , व्यावसायिकांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी इस्लामपूर बिझनेस फोरम (आयबीएफ)ची स्थापना केली. व्यावसायिकांना कोरोना काळात आयबीएफ चा आधार मिळाला. आयबीएफ एक्स्पोचे २०२३ मध्ये पहिल्यांदाच प्रदर्शन आयोजित केले होते. त्यात १०० व्यावसायिक सहभागी झाले तर पाच हजार लोकांनी एक्स्पोला भेट दिली होती. यामध्ये जवळपास पाच कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. तसेच स्थानिक व्यापाऱ्यांसाठी ऑक्टोबर २०२४ मध्ये दसरा-दिवाळी योजना आयोजित केली होती. त्यामध्ये शहरातील ५० व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला होता, त्यावेळीही साडे चार कोटी रुपयांची उलाढाल झाली.
इस्लामपूर बिझनेस फोरमची स्थापना ज्या उद्देशाने केली होती. त्या दृष्टीने आयबीएफला व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे दि. १८ ते २१ फेब्रुवारी दरम्यान 'आयबीएफ एक्स्पो २०२५' चे आयोजन केले आहे. या एक्स्पो मध्ये ११० व्यापारी स्टॉल आणि १५ फूड स्टॉल असतील. या चार दिवसात ३५ हजार नागरिक भेट देतील तर जवळपास १० ते १२ कोटींवर उलाढाल होईल. असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
तसेच इस्लामपूर शहर व परिसरातील तसेच वाळवा तालुक्यातील व्यापारी, उद्योजक व व्यवसायिकांनी पुढाकार घेऊन आपला सहभाग नोंदवावा. तसेच नागरिकांनी ही या बिसनेस एक्स्पो चा लाभ घ्यावा. असे आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी उपाध्यक्ष प्रवीण फल्ले, नवाज पटवेकर व कोअर कमिटी तसेच प्रमुख सदस्य उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संयोजन सचिव विश्वजित पवार, प्रवीण पाटील, शहाजी पाटील, महेश ओसवाल, स्वरूप साळुंखे, वैभव पाटील, मोहन जाधव, जयदीप पाटील, भगतसिंह पाटील, नवाज पटवेकर, सुप्रिया संग्राम पेटकर, पुष्पलता खरात हे करित आहेत.





Social Plugin