संदिप गावडे, आष्टा/ प्रतिनिधी
आष्टा येथील जायंटस् ग्रुपचे अध्यक्ष तसेच कृषिभूषण सुनील माने यांनी आपल्या शेतात राबणाऱ्या शेतमजुराच्या मुलीचा वाढदिवस स्वखर्चाने साजरा करून समाजात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
कृषिभूषण सुनिल माने हे नेहमीच आपल्या शेती आणि सामाजिक क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबवित असतात. चार महिन्यापूर्वी त्यांनी आपल्या लाजरी या ट्रॅक्टरचा ३० वा वाढदिवस दिमाखात साजरा केला होता. त्यातूनच त्यांची शेती विषयी असलेली आपुलकी व प्रेमभावना लक्षात येते.
त्याचबरोबर ऊसतोड मजुरीसाठी आलेल्या विजापूर जिल्ह्यातील सिद्धाप्पा व भारती बडगेर हे पतिपत्नी २०१० पासून आष्टा येथेच आपल्या कुटुंबासह सुनिल माने यांच्या शेतात शेतमजुरी करीत राहत आहेत. त्या शेतमजूराने आपल्या साक्षी या मुलीचा १३ वा वाढदिवस असल्याने सुनिल माने यांचेकडे उसणे पैसे मागितले. तेव्हा त्या शेतमजूराच्या मुलीला नवीन कपडे, केक, चॉकलेट व इतर साहित्य घेऊन स्वतः सुनिल माने व त्यांचे कुटुंबीय त्या शेतमजूराच्या घरी पोहचले.
तसेच सुनिल माने यांनी आपल्या जायंटस् ग्रुपच्या सदस्यांनाही बोलावून साक्षीचा वाढदिवस मोठया उत्साहात साजरा केला. आपल्या सारख्या सामान्य कुटुंबातील मुलीचा वाढदिवस इतक्या मोठया प्रमाणात साजरा साजरा होत असल्याने त्या शेतमजूराच्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. सुनील माने आणि त्यांच्या कुटुंबीयांनी शेतमजुराच्या मुलीचा साजरा केलेला वाढदिवस आष्टा परिसरात चर्चेचा विषय ठरला असून त्यांनी एक समाजात एक नवा आदर्श ठेवला आहे.





Social Plugin