पालघर - प्रतिनिधी धनेश क्षीरसागर
पालघर, दि.२३:- सायबर फसवणूकीच्या माध्यमातून ऐश्वर्य संपादित करता येत नाही. तरुण पिढीने सुयोग्य मार्गाचा अवलंब करून कष्ट करून ऐश्वर्य संपादित करावे. सुयोग्य मार्गाने मिळालेले ऐश्वर्य कायमस्वरुपी टिकते. तरुणांनी सायबर फसवणूकीपासून सावध रहावे असे, आवाहन वनमंत्री तथा पालघर जिल्हयाचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले.
आगामी होणारा जनता दरबार दि.७ एप्रिल २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन सभागृह येथे सकाळी १०.०० वा. आयोजित करण्यात आलेला आहे. नागरिकांनी आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी दि.७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०.०० वा. लेखी अर्जासह उपस्थित रहावे, असे आवाहन पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सात कलमी कार्यक्रमाच्या अनुषंगाने सुरु करण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत सायबर सुरक्षित योजनेचा शुभारंभ पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.
या यावेळी खा. हेमंत सवरा, आ. विनोद निकोले, आ. हरिश्चंद्र भोये, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे आदि मान्यवर उपस्थित होते.
आपला पिन, ओटीपी, पासवर्ड कोणालाही देऊ नका. आपल्या मोबाईलमध्ये आलेली कोणतीही अनोळखी लिंक मोबाईलमध्ये उघडू नका. अनोळखी फोन कॉल, व्हिडीओ कॉल स्विकारू नका. शेअर व इतर गुंतवणूकीमध्ये त्वरीत मोठा परतावा देणाऱ्या संशयास्पद गुंतवणूकीच्या अॅप्सद्वारे गुंतवणूक करणे टाळावे. जर आपली सायबर फसवणूक होत असल्याचे जाणवल्यास अथवा सायबर फसणूक झाल्यास १९३०/१९४५/१४४०७ या संपर्क नंबरवर कॉल करा किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन पाककमंत्री गणेश नाईक यांनी केले.
प्लास्टिक मुक्त आणि दुर्गंधी मुक्त पालघर मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्व नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेऊन दुर्गंधीमुक्त करावा. या मोहिमेअंतर्गत रस्त्या लगत असलेल्या दुकानांच्या मालकांसोबत चर्चा करण्यात येणार असून रस्त्या लगत होणाऱ्या कचरा व दुर्गंधी यावर उपाययोजना करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये भरीव योगदान देणाऱ्यांना बक्षीस देण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.
सात कलमी कार्यक्रमाअंतर्गत पालघर पोलीस दलांनी प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल श्री. नाईक यांनी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचे अभिनंदन केले. यावेळी सायबर सुरक्षा विषयी जनजागृती करणाऱ्या चित्ररथाचे लोकार्पण पालकमंत्री श्री. नाईक यांच्या हस्ते झाले.
.jpg)




Social Plugin